२००५ साली ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी अशा दमदार कलाकारांनी झी मराठीवरील ‘या सुखांनो या’ ही मालिका गाजवली होती. मालिकेत “श्रद्धा रानडे” हिने बालकलाकाराची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. मराठी सृष्टीत एक बालकलाकार म्हणून नावारूपास आलेली श्रद्धा रानडे आज मराठी सृष्टीपासून थोडीशी दुरावलेली पाहायला मिळत आहे . तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या श्रद्धाला मराठी सृष्टीत काम मिळाले ते ओघानेच. चांगले संस्कार व्हावेत यादृष्टीने तिने शालेय सुट्ट्यांमध्ये नाट्यशिबिरात सहभाग दर्शवला होता. इथेच एका मुलीला जाहिरातीतील एक सिन जमत नव्हता.

तुला एव्हढही जमत नाही,केव्हढं सोप्प आहे… असे म्हणून श्रद्धाने अगदी लहान वयातच जाहिरातीत काम मिळवले. ई टीव्ही वरील भाग्यविधाता,झी टीव्हीवरील ममता , झी मराठीवरील या सुखांनो या, मी मराठीवरील खेळ मांडला अशा मालिकेतून तिला बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी मिळाली. या सुखांनो या मालिकेवेळी श्रद्धा तिसरीत शिकत होती. सेटवरील सर्वच कलाकार तिच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष द्यायचे. इंग्रजी माध्यमातून शिकत असलेल्या श्रद्धाला मराठीतून लिहिलेली स्क्रिप्ट वाचायला कठीण जात त्यावेळी या सर्वच कलाकारांनी तिला ती लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्यास प्रवृत्त केले. हमाम साबण, अँम्बी व्हॅली, डॉ फिक्सइट अशा जाहिराती तसेच डिसनी वाहिनीच्या पेटपूजा शो, आम्ही सारे खवय्ये चिल्ड्रन स्पेशल, सह्याद्री वाहिनीच्या दमदमादम अशा शोमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. जॉनी लिव्हरसोबत “होप ऑफ कार्निव्हल” ही टेलिफिल्म तीने तब्बल पाच भाषांमध्ये सादर केली. अभिनयासोबतच अनेक वर्षांपासून तीने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. दहावीत असताना तिने ओरिसा सेमिक्लासिकलच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. शालेय शिक्षणानंतर श्रद्धाने डी जी रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून कॉमर्स विषयातून पदवी मिळवली आहे. पूढे चालून याच क्षेत्रात काही चांगली संधी मिळाल्यास तिला ते करायला नक्की आवडेल, असे ती म्हणते.