सध्या अनेक मालिकेच्या नायिका पाहिल्या तर त्या संकटांवर मात करणाऱ्या, कोणत्याही अडथळ्याला झुगारून पुढे जाणाऱ्या, परिस्थितीला नमवणाऱ्या दाखवल्या जात आहेत. विशेष म्हणजे गृहिणीने ठरवले तर ती काहीही करू शकते या मध्यवर्ती संकल्पनेवर मालिकेची नायिका घराघरात पोहोचत आहे. यामध्ये सध्या प्रेक्षकांचं मन जिंकण्यात तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनी वाघमारे या व्यक्तिरेखेने बाजी मारली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर अभिनेत्री दीपा परब हिने छोट्या पडदयावर पुनरागमन केलं आहे. नवऱ्याला आर्थिक समस्या निर्माण झाल्यानंतर घराची जबाबदारी घेणाऱ्या एका साध्या गृहिणीच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणाऱ्या या मालिकेतील दीपा परबने नुकताच तिच्या सोशलमीडियावर एक अनुभव शेअर केला आहे. मालिकेत अश्विनी म्हणून ब्युटीशियन होण्याचं स्वप्नं पाहणारी नायिका खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा एका अश्विनीला भेटते तेव्हा त्यातून मिळणारं समाधान वेगळच आहे असं म्हणत दीपाने हा किस्सा तिच्या चाहत्यांना सांगितला आहे.

तू चाल पुढं ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. अश्विनी आणि श्रेयस वाघमारे हे घर बांधण्यासाठी जो प्लॉट खरेदी करतात तिथे भूमीपूजन करत असताना गणपतीची मूर्ती सापडते. या कारणावरून ग्रामस्थ त्याठिकाणी घर बांधण्याऐवजी मंदिर बांधण्याचा हट्ट करतात. परिणामी हा प्लॉट कोर्टाच्या केसमध्ये अडकतो. मोजलेले पैसे हातचे जातात. कर्ज होतं. यामुळे अश्विनीचा नवरा श्रेयस भ्रमिष्ट होतो. यातून मार्ग काढण्यासाठी अश्विनीला काही काम करण्याशिवाय पर्याय नसतो. ती गृहिणी असली तरी तिच्याकडे ब्युटीशियनचं कौशल्य असतं. यामध्ये तिची मुलगी मयुरी आणि सासरे साथ देतात. यातूनच अश्विनीला एका ब्युटीपार्लर चेनमध्ये नोकरी मिळते. अश्विनी आता तिच्या स्वप्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. सध्या तू चाल पुढं या मालिकेत हा ट्रॅक सुरू आहे. याच निमित्ताने अभिनेत्री दीपा परब जेव्हा आउटडोअर शूटसाठी गेली तेव्हा तिची भेट एका अशा महिलेशी झाली जिने अश्विनीप्रमाणेच तिची खानावळ सुरू करण्याचं स्वप्नं पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करून ही महिला सध्या खानावळ चालवत आहे. या महिलेचं नाव आहे गौरवी गुरूप्रसाद मलबारी. दीपाने या खानावळीला भेट दिली आणि गौरवीशी संवाद साधला. दीपाने गौरवीसोबत फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

दीपा या पोस्टमध्ये असं लिहित्येय की, अश्विनीच्या स्वप्नांची नवी सुरूवात होत असताना तू चाल पुढं मालिकेच्या आउट डोअर शूटिंग दरम्यान ज्यांनी खऱ्या आयुष्यात खानावळ उघडण्याचं स्वप्नं पाहिलं त्या गौरवीताईंना भेटण्याची संधी मिळाली. अश्विनीची भूमिका साकारत असताना अशाप्रकारे वास्तविक आयुष्य जगणाऱ्या अश्विनीला पाहून आपण करत असलेल्या कामाची कौतुकाची थाप पाठीवर पडते आणि त्याचं विलक्षण समाधान मिळतं. अश्विनी साकारण्याची संधी मिळाली आणि अशा असंख्य गृहिणी ज्या वेळ पडली तर अर्थार्जन करून घर सावरू शकतात हे दाखवता आलं. दीपा परबने शेअर केलेल्या अनुभवाला अनेकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, दीपाने कुटुंब आणि मुलाच्या जबाबदारीसाठी १४ वर्षापूर्वी अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला होता. दीपाचा नवरा अंकुश चौधरी हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. आता दीपा पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात आली असून तू चाल पुढं या मालिकेत अश्विनी वाघमारे ही भूमिका साकारत तिने चाहत्यांची पसंती मिळवली आहे.