बिग बॉस मराठी सीजन 4 चा विजेता ‘अक्षय केळकर’ सध्या काय करतोय हे तुम्हाला माहित आहे का? बिग बॉसनंतर अक्षय आपल्याला काही टीव्ही शोजमध्ये पाहायला मिळाला. परंतु आता एका नव्या अंदाजात अक्षय रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. पुन्हा धमाल, मस्ती करण्यासाठी आणि तरुणींची नजर खीळवून ठेवण्यासाठी अक्षय सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील पुन्हा नव्याने सुरू होणारा ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम 1 जुलैपासून सुरू होत आहे. या कार्यक्रमामध्ये अक्षय आपल्याला निवेदकाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ अक्षयनेत्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. “लावणीचा हा हंगाम आहे नवा आणि अक्षय केळकर आहे तुमच्या आणि लावण्यवतींमधील दुवा”. असं भन्नाट कॅप्शन लिहत अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हा कार्यक्रम भारताच्या संस्कृतीचा आणि लावणी कलावंतांचा मान ठेवून सुरू करण्यात येणार आहे. अशातच या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अक्षय फारच हँडसम दिसत आहे. शूटिंग दरम्यान अक्षय आपल्याला लाल आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. ढोलकीच्या तालावर नाचणाऱ्या लावण्यवतींची वेगवेगळी अदाकारी पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. अशातच या नव्या पर्वात लावण्यवती म्हणुन कोणकोण असणार आहेत याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. हा कार्यक्रम पूर्णतः लावणीवर आधारित असून, मागील पर्वात न्यायाधीश म्हणून मानसी नाईक, दिपाली सय्यद, शकुंतला नागरकर, जितेंद्र जोशी हे होते. आता या पर्वामध्ये न्यायाधीश म्हणून कोणते कलाकार असणार आहेत याची चर्चा सुरू झाली आहे.