ज्येष्ठ अभिनेते “किशोर नांदलस्कर” यांचे आज दुपारी १२.३० वाजता दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना को’रो’ नाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते परंतु उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आज या हरहुन्नरी कलाकाराबद्दल थोडक्यात आढावा घेऊयात… किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईचाच, मुंबईतच ते लहानाचे मोठे झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळील शेजवली हे त्यांचे मुळगाव परंतु वडील खंडेराव नांदलस्कर हे जाणते कलाकार त्यांनी अनेक नाटकांतून स्री पात्र देखील साकारली होती. मुंबईतील ज्युपिटर गिरणीत काम करत असतानाच त्यांनी कामगार नाट्यस्पर्धेतून अनेक नाटकं बसवली. याच वलयाभोवती किशोरजींचेही बालपण गेले. आपणही नाटकात काम करावे अशी ईच्छा त्यांच्याही मनात निर्माण झाली. सुंदरा मनामध्ये भरली, नथीतून मारला तिर यासारख्या अनेक नाटकांतून छोट्या मोठ्या भूमिका बजावत असतानाच काही काळ नोकरी देखील स्वीकारली. ८० च्या दशकातील दूरदर्शनवरील गजरा या गाजलेल्या कार्यक्रमात झळकण्याची नामी संधी त्यांना मिळाली आणि इथूनच पुढे त्यांना आपली खरी ओळख निर्माण करता आली. महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटातून त्यांचे बॉलिवूड सृष्टीतदेखील पदार्पण झाले. जीस देश में गंगा रहता है, खाकी, तेरा मेरा साथ रहे, हलचल, ये तेरा घर ये मेरा घर अशा आणखी काही बॉलिवूड चित्रपटातून त्यांना अमिताभ बच्चन, अजय देवगण, गोविंदा यांच्या सोबत काम करता आले. जीस देश में गंगा रहता है चित्रपटातील त्यांनी साकारलेला “सन्नाटा” विशेष लक्षवेधी ठरलेला पाहायला मिळाला.
त्यामुळेच त्यांची ही भूमिका रसिकजनांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. मराठी नाटक, मालिका, चित्रपट ते बॉलिवूड पर्यंत मजल मारणाऱ्या या कलाकाराने आपल्या कारकिर्दीत नेहमीच दुय्यम भूमिका साकारल्या. परंतु असे असले तरी ज्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या त्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने तितक्याच दिमाखात रंगवल्या. मिळालेल्या भूमिकांची लांबी रुंदी त्यांनी कधी मोजलीच नाही परंतु आपल्या अभिनय शैलीतून रंगवलेल्या त्यांच्या या भूमिकांनी रसिकांना मनमुराद हसवण्यास, तर कधी रडवण्यास भाग पाडले. पूर्व मुंबईतील भोईवाडा-परळ भागात त्यांचं छोटंसं घर होत पुरेशा जागेअभावी रात्रीच ते मंदिरात झोपायला जायचे. ही बातमी वृत्तपत्रात छापून आली होती ही बाब जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना समजली तेव्हा त्यांनी किशोर नांदलस्कर यांच्यासाठी घर मंजूर करू दिले होते. बोरीवलीत त्यांना त्यांचं हक्काच घर मिळालं होतं. मधल्या काळात हुंटाश, मिस यु मिस अशा आणखी काही मराठी चित्रपटातून ते नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिले. नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात त्यांच्या या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. किशोर नांदलस्कर यांच्या मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील या योगदानाबद्दल सांगावे तेवढे थोडेच आमच्या टीमकडून या बहुगुणी कलाकाराला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली..