पूर्वी महिला चित्रपटात काम करत नसत त्यामुळे स्त्री भूमिका पुरुषांनाच साकारावी लागत असे. पुरुष मंडळी साड्या नेसून रंगमंचावर यायला सुरवात झाली पण बोटांवर मोजावे इतक्याच पुरुषांना ह्यात यश मिळालं. हे क्षेत्र चांगले नाही अशा विविध भावना त्यांच्यामध्ये रुजवल्या गेल्या होत्या. याकरणास्तव पुरुषांनाच महिलांची पात्रे साकारायला लागायची. बालगंधर्व हे त्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. परंतु सध्याच्या काळात चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून अनेक अभिनेत्यांनी देखील स्त्री पात्र साकारली आहेत त्यातील काही निवडक अभिनेत्यांची माहिती …

१. दिलीप प्रभावळकर – दिलीप प्रभावळकर यांनी झपाटललेला या मराठी चित्रपटातील ‘तात्या विंचू’ आणि ‘चौकट राजा’ तसेच ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी ‘आबा गंगाधर टिपरे ‘ म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या ‘चिमणीव’ मराठी रंगभूमीवरील, ‘हसवा फसवी’ आणि ‘वासूची सासू’ मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या. वासूची सासू मध्ये त्यांनी महिलेच्या वेशात निभावलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. दिलीप प्रभावळकर ह्यांनी आजवर अनेक वेगवेगळी पात्र साकारली आहेत अनेकांना त्यांचे चित्रपटातील फोटो पाहून हे नक्की दिलीप प्रभावलकरच आहेत का असा प्रश्न पडतो. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला ते न्याय देतात, त्यासाठी खूप मेहनत घेतात त्यामुळेच आज मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते खूप मोठं नाव कमवू शकले.

२. अशोक सराफ- नायक, खलनायक अशा विविध भूमिकेतून अशोक सराफ यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. परंतु अशोक सराफ हे देखील स्त्री वेशात मराठी चित्रपटात झळकले आहेत. १९८४ सालच्या “गुलछडी” या चित्रपटात अशोक सराफ यांनी “नवी नवी नवरी…” या गाण्यात स्त्री वेशात गाण्यावर नृत्य सादर केले होते आणि चित्रपटातील खलनायक अरुण सरनाईक यांना पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला होता. ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती सुषमा शिरोमणी यांनी अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. यांच्या गुलछडी या चित्रपटातून अशोक सराफ यांना काही काळासाठी स्त्रीपात्र निभावण्याची संधी मिळाली होती.

३. लक्ष्मीकांत बेर्डे- लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली अशी ही बनवाबनवी चित्रपटातली पार्वती सर्वांच्याच मनात घर करून गेली हे वेगळे सांगायला नको. ‘सारखं सारखं एकाच अंगावर काय’…, ‘नवऱ्यानं टाकलंय हिला…’ हे डायलॉग पार्वतीची आठवण करून देणारे ठरले तर अनेक मिम्स या डायलॉगवर बनवण्यात आले. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री भूमिका साकारलेला चित्रपट कोणता हे विचारल्यावर अशी ही बनवाबनवी हे नाव प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर लगेचच उभे राहते. याच चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी देखील स्त्री पात्र गाजवले होते. त्यामुळे या यादीत त्यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. अर्थात विजय चव्हाण यांनाही विसरून कसे चालेल. मोरूची मावशी विजय चव्हाण यांनीच तर गाजवली होती त्यामुळे त्यांचाही स्त्री पात्र साकारण्यात वेगळाच हातखंडा होता. अशी पुढे बरीच नावे घेता येतील ज्यांनी मराठी सृष्टीत स्त्री पात्र साकारलेली आहेत. मात्र काही मर्यादांमुळे इथेच थांबावे लागत आहे…

४. सचिन पिळगावकर – सचिन पिळगावकर अगदी बाल वयापासून हिंदी चित्रपटांत पाहायला मिळाले. मराठी चित्रपटात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेता, प्रोड्युसर तसेच डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. अनेक चित्रपटात त्यांनी स्वतः गाणी देखील गायली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य हे त्यांच्या यशामागचं गुपित असल्याचं ते नेहमी सांगतात. अशी हि बनवा बनवी चित्रपटात त्यांनी स्त्री व्यक्तिरेखा देखील साकारली होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर अश्या दिग्गज कलाकारांमुळे हा चित्रपट अजरामर झाला.

५. मोहन गोखले- मोहन गोखले यांनी मराठी तसेच हिंदी सृष्टीतील एक काळ गाजवला होता. चित्रपट, मालिका अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे ते पती तर अभिनेत्री सखी गोखलेचे ते वडील होते. मिस्टर योगी ही त्यांची गाजलेली हिंदी मालिका. ‘हेच माझे माहेर’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘आज झाले मुक्त मी’ , ‘अरे संसार संसार’ , ‘ठकास महाठक’ यासारख्या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या ‘बन्या बापू’ या चित्रपटातल्या ‘प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणाऱ्या’ बन्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ठकास महाठक या चित्रपटात अशोक सराफ, निळू फुले यांच्यासोबत त्यांनी काम केले त्यावेळी स्त्री भूमिका त्यांनी सुरेख साकारलेली पाहायला मिळाली होती. अर्थात चित्रपटात सर्वानाच गंडवण्यासाठी त्यांचे हे पात्र अधोरेखित करणारे ठरले होते.

६. सुबोध भावे- मराठी सृष्टीतील एक तगडा अभिनेता म्हणून मधल्या काळात सुबोध भावाने एकापाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक टीव्ही मालिकांमधूनही त्याला अभिनयाची संधी मिळत गेले. रवी जाधव दिग्दर्शित २०११ सालच्या “बालगंधर्व ” या चित्रपटात सुबोध भावेला बालगंधर्व साकारण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणेच बालगंधर्व यानी स्त्री पात्रे साकारली होती त्यामुळे सुबोधला देखील या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. आजवरच्या कारकिर्दीत या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने प्रथमच स्त्री भूमिका साकारली असावी.

७. विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला. अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र होते. विजय कदम, चव्हाण आणि अन्य एक मित्र या तिघांनी मिळून “रंगतरंग’ नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे “टुरटूर’ नाटक बसवत होते. लक्ष्याने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना “हयवदन’ हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून “मोरूची मावशी’साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी विक्रम केला. महाराष्ट्रातच नाही तर विविध देशांत जाऊन त्यांनी मराठी रंगभूमीला दिलेले योगदानाला खूप प्रसिद्ध मिळाली.