गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आता चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री, निर्माती तृप्ती भोईर हिने हे धाडसाचे पाऊल उचलत नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. या कृतीमुळे तृप्ती भोईरचे मोठे कौतुक होत आहे. नुकतेच तृप्तीने आपल्या आगामी चित्रपटासाठी शरण आलेल्या नक्षलवाद्यांची ऑडिशन घेतली. त्यातून अनेक उत्कृष्ट कलाकार तिला आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी मिळाले. खरं तर या भागातील महिलांना मासिक पाळी आली की घरापासून बाजूला असलेल्या एका राखीव खोलीत त्यांना ठेवले जाते. त्या खोलीला किंवा घराला “कूर्माघर” असे संबोधले जाते. कुर्माघर याच नावाने तृप्ती भोईर एक हिंदी चित्रपट बनवत आहे.

यासाठी तिने स्थानिक कलाकार आपल्या चित्रपटात असावेत असा हट्ट धरला होता. गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातले काही नक्षलवादी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात. ह्या व्यक्तिंना मूळ प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. नवजीवन वसाहतीत त्यांचे पुनर्वसन केले जाते. याच नवजीवन वसाहतीला भेट देऊन तृप्तीने काही आत्मसमर्पण केलेल्या महिलांच्या आणि पुरुषांच्या ऑडिशन घेतल्या. यातील निवडलेल्या कलाकारांना आता तिच्या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, पुढेही या लोकांना कलाक्षेत्रात काम मिळावे म्हणून मी प्रयत्न करत राहणार आहे. तृप्ती भोईर ही प्रयोगशील अभिनेत्री आहे. अगडबम या चित्रपटात तिने नाजूका ही एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली होती. टुरिंग टॉकीज, इश्श, उचला रे उचला, माझा अगडबम या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोकणातील आदिवासी लोकांसाठी ती काम करत आहे. शेलटर फाउंडेशनची स्थापना करून या मार्फत ती आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळवून देत आहे.

त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री अशी ओळख तिने मिळवली आहे. आता तर शरण आलेल्या नक्षलवाद्यांना चित्रपटात संधी देऊन तिने एक धडासाचेच पाऊल उचललेले पाहायला मिळत आहे. एक उदाहरण द्यायचंच झालं तर मिथुन चक्रवर्ती हे सुद्धा नक्षलवादी होते. तरुण वयात त्यांनी हे चुकीचे पाऊल उचलले होते मात्र कालांतराने त्यांनी काढता पाय घेतला आणि थेट पुणे गाठले होते. पुण्यात आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनयाचे धडे गिरवले आणि हिंदी चित्रपटातून नायकाच्या भूमिका साकारत सुपरस्टार बनण्यापर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे तृप्ती भोईरने निवडलेले हे कलाकार त्यांच्या अभिनयाच्या जोरावर पुढे जाऊन प्रेक्षकांच्या मनात घर करू शकतील असा विश्वास तिला वाटत आहे.