झी मराठी ही वाहिनी सुरुवातीला अल्फा मराठी या नावाने ओळखली जायची. खाजगी वाहिनीवरील सर्वात गाजलेली पहिली वहिली मराठी मालिका म्हणून “आभाळमाया” मालिकेने आपले स्थान इतिहासाच्या पानांत नोंदवले आहे. २००० साली सुरू झालेली ही मालिका तब्बल तीन वर्षे रसिकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसली. वास्तवाशी निगडित असणाऱ्या अशाच धाटणीच्या मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळोत अशीच एक मागणी आता चोखंदळ प्रेक्षक करताना पाहायला मिळतात. आभाळमाया मालिकेचे शीर्षक गीत तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. आभाळमायाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या मालिकेतील कलाकार तब्बल १६ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले होते. आज मालिकेला प्रसारित होऊन २० वर्षे लोटली आहेत त्यातील या बालकलाकार आता कशा दिसतात ते जाणून घेऊयात.

मालिकेत सुकन्या मोने यांनी सुधाची भूमिका तर मनोज जोशी यांनी शरद ची भूमिका साकारली होती. सुधा आणि शरद यांना आकांक्षा आणि अनुष्का या दोन मुली दर्शवल्या होत्या. आकांक्षाची भूमिका अभिनेत्री परी तेलंग हिने साकारली होती तर अनुष्काची भूमिका “ऋचा पाटकर” हिने साकारली होती. मालिकेतील बरेचशे कलाकार (सुकन्या मोने, मनोज जोशी, हर्षदा खानविलकर, संजय मोने, परी तेलंग, अंकुश चौधरी) आजही अभिनय क्षेत्रात आपला तग धरून आहेत परंतु ऋचा पाटकर या मालिकेनंतर कुठल्याच मालिकेत किंवा चित्रपटात फारशी पाहायला मिळाली नाही तिच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… मालिकेत अनुष्का ची भूमिका साकारलेली “ऋचा पाटकर ” मुंबईतच लहानाची मोठी झाली. के सी कॉलेज तसेच रामणारायन रुईया कॉलेजमधून तीने पदवीचे शिक्षण घेतले आहे. साधारण २०१३ साली ती आदित्य नागवेकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. ऋचाला नृत्याची देखील विशेष आवड आहे. यासोबतच देशविदेशातील दौरे करून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन, तिथली संस्कृती जाणून घेणे व त्याबद्दल लिहिणे ऋचा आणि तिच्या पतीला आवडते. शिवाय वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखणे आणि ते स्वतः हाताने बनवणे ही तिची मोठी आवड. इन्स्टाग्रामवर यासंदर्भात terrifictummytales आणि happygallyvanter नावाने ती याबाबतची माहिती शेअर करत असते. ऋचाचे वडील ज्ञानराज पाटकर हेही एक उत्तम कलाकार आहे. काही मोजक्या टीव्ही मालिका तसेच नाटकांतून त्यांनी कामे केली आहेत.