जेष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी १२.०० च्या सुमारास त्यांच्या फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. लग्ना आधीच्या (माहेरच्या) सुलोचना कदम मुंबईतील एका चाळीत राहत होत्या. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा”. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे.

असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास “कलगीतुरा” या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव “एस. चव्हाण” होते. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच “रंगल्या रात्री अशा” या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि “नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची” या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खऱ्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. “मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. आज शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी फणसवाडी येथील निवासस्थानी दुपारी १२ च्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. अनेक कलाकार आणि चाहते मंडळींनी हळहळ व्यक्त केली.