माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ सध्या दोन प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. चला हवा येऊ द्या मध्ये ती विनोदी स्कीट्स सादर करताना दिसते तर दुसऱ्याच बाजूला ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. मात्र या मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याने कलाकारांमध्ये दहशतीचे वातावरण पहायला मिळाले. यामुळे मालिकेच्या सेटवर एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. नीरजा या मालिकेचे सुरुवातीच्या भागांचे चित्रीकरण कलकत्ता येथे पार पडले होते मात्र त्यानंतर हा सेट गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आणण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून फिल्म सिटी मध्येच मालिकेचे चित्रीकरण पार पडत होते. पण काल अचानक मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्याचे पाहून भीतीचे वातावरण तयार झाले. गोरेगाव फिल्मसिटीचा आसपासचा परिसर जंगलाने व्यापलेला आहे. इथे अनेक वन्य प्राणी तुम्हाला आढळतील. पावसामुळे आश्रय घेण्यासाठी जंगलातली माकडं सेटवरच्या छतावर येऊन बसली होती. या माकडांना पकडण्यासाठी बिबट्या तिथे घुसला मात्र लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने तिथून पळ काढला. मालिकेच्या सेटवर कॅमेरे बसवण्यात आले होते. सेटवरचा तिथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे ज्यात बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसतो आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘वो तो अलबेला’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आढळला होता. मात्र लोकांच्या जमावाने बिबट्याला पळवून लावले होते. त्यानंतर आता काही दिवसातच पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळल्याने फिल्मसिटीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कलाकार मंडळी जीव मुठीत घेऊनच सेटवर फिरत आहेत. त्यामुळे एक वेगळीच काळजी व्यक्त करण्यात येत आहे. नीरजा या मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकताना दिसत आहेत. मराठी बिग बॉस फेम स्नेहा वाघ आणि मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत आहेत तर काम्या पंजाबी ही अभिनेत्री विरोधी भूमिकेत दिसत आहे. मालिकेला सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत मात्र प्रेक्षकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.