खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. शिवप्रताप गरूडझेप या सिनेमानंतर सध्या ते विश्रांती घेत आहेत. पण या सक्तीच्या विश्रांतीकाळात ते काय करत आहेत याची उत्सुकता चाहत्यांना आहे. अमोल यांच्या विश्रांतीकाळ आनंदात जाण्याची सोय त्यांच्या खास मित्राने केली आहे. मित्राने त्यांना असं काहीतरी दिलय की जे अमोल यांच्या मनात होतं. काही दिवसांपासून त्यांना मानेचा त्रास जाणवू लागला मानेच्या दुखण्यापासून आराम मिळावा ह्याकरता त्यांच्या मानेला गार्ड देखील लावण्यात आलं आहे. सिनेमा, मालिका किंवा नाटक या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय जरी आला तरी ती चर्चा डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही इतकं अमोल कोल्हे आणि शिवाजी महाराज यांची भूमिका हे समीकरण झालं आहे. राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी या दोन्ही मालिकांमधील अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या निर्मितीसाठी तर डॉ. अमोल यांनी स्वताचे घरही विकले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा शिवप्रताप गरूडझेप हा सिनेमाही गाजला. खासदार म्हणून काम करत असलेले डॉ. अमोल कोल्हे हे अभिनयक्षेत्रातही वेगळेपण जपत आहेत. नेहमी काही ना काही कामात व्यस्त असलेले डॉ. कोल्हे सध्या मात्र सक्तीच्या विश्रांतीवर गेले आहेत. पण या विश्रांतीकाळात त्यांच्या हाती एक अशी गोष्ट आली आहे की ती चाहत्यांना दाखवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. अमोल कोल्हे हे गेल्या दोन वर्षापासून खूपच वस्त होते. त्याआधी २०२१ला अमोल कोल्हे अज्ञातवासात गेले होते. त्याची काही कारणं होती जी त्यांनी सांगितली होती. आत्मपरीक्षण करण्यासाठी ते सर्वांपासून लांब गेले होते. पण त्यानंतर पुन्हा त्यांनी खासदारकीचं काम आणि अभिनय क्षेत्रातील कामासाठी वाहून घेतलं. आता पुन्हा त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी असं वाटल्याने त्यांनी पुन्हा एकदा एकांतवास निवडला आहे. पण या एकांतवासात त्यांना सोबत करण्यासाठी त्यांचा मित्र वैभव शेटकर याने एक सोय केली आहे. याविषयीच अमोल कोल्हे यांनी सोशलमीडियावर पोस्ट करत चाहत्यांशी संवाद साधला आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टापेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ते एका वेताच्या झोपाळ्यावर बसलेले असून त्यांच्या हातात एक पुस्तक आहे. पैशापाण्याची गोष्ट याच पुस्तकाविषयी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असं लिहिलं आहे की, वेळेचा सदुपयोग. काल माझा मित्र वैभव शेटकर याने पुस्तक भेट दिलं.

मित्र मनातलं ओळखतात की काय. माझी सक्तीची विश्रांती सत्कारणी लावण्याची सोय झाली. या पुस्तकाविषयी लवकरच व्हिडिओ करणार आहे. या फोटोसोबत अमोल यांनी पैशापाण्याची गोष्ट या पुस्तकासोबतचा फोटोही शेअर केला आहे. प्रफुल्ल वानखेडे लिखित हे पुस्तक वाचण्याचं अमोल यांच्या कधीपासून मनात होतं आणि तेच पुस्तक मित्र वैभव याने अमोल यांना दिल्याचं दिसत आहे. अमोल यांनी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मानेची काळजी घ्या अमोलजी अशी कमेंट केली आहे, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून डॉ. कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप कोल्हे यांनी त्याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. तर गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर डॉ. कोल्हे यांनी एक व्हिडिओ बनवून कोश्यारी यांना सुनावले होते. समाजातील इतरही चुकीच्या गोष्टींवर डॉ. कोल्हे हे आवाज उठवत असतात. सध्या मात्र ते सक्तीची विश्रांती घेत असून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक वाचत आहेत. बुद्धी असो किंवा पैसा, त्याचा योग्य वापर कसा करावा या विषयावर हे पुस्तक लिहिले आहे.