भिक्षेकरूंचे डॉक्टर म्हणून नाव लौकिक असलेले पुण्यातील हे डॉक्टर आहेत डॉ अभिजित सोनवणे. सोमवार ते शनिवार हे डॉक्टर पुण्यातील मंदिर परिसरात जाऊन तिथे असलेल्या भिक्षेकरूंचे मोफत उपचार करत असतात. त्यांच्या या कामात त्यांची पत्नी डॉ मनीषा सोनवणे यांचीही मोठी साथ त्यांना मिळत आहे. डॉ मनीषा यांचे शिवाजीनगर येथे क्लिनिक आहे शिवाय काही हॉस्पिटलमध्ये त्या सेवा देत आहेत. त्यांच्या या कामातून मिळणारा पैसा त्या भिक्षेकरूंच्या उपचारासाठी वापरतात त्यासाठी त्यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली आहे.

या सोहम ट्रस्ट मार्फत “खराटा पलटण” हा अनोखा उपक्रम राबवून पुण्यातील गल्ल्या स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी नुकताच सुरू केला आहे. भिक्षेकरूंना हाताला काम मिळावे या हेतूने त्यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या या कष्टाला दिवसाला २०० रुपये देखील त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. आज डॉ अभिजित सोनवणे यांच्या पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घेऊयात… डॉ अभिजित सोनवणे हे मूळचे साताऱ्याचे, त्यांचे आजोबा नामदेवराव व्हटकर हे कला क्षेत्राशी निगडित होते. त्यांच्या आई गायिका डॉ भारती सोनवणे तर त्यांचे वडील डॉ पांडुरंग सोनवणे हे निवृत्त चीफ मेडिकल ऑफिसर. या दोन्ही डॉक्टर दाम्पत्याना तिन अपत्ये डॉ अभिजित, अमित आणि दीप्ती. डॉ अभिजीर यांचा भाऊ अमित सोनवणे हे पेशाने वकील आहेत तर बहीण “दीप्ती सोनवणे” या नाट्य सिने अभिनेत्री म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत.

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेबांची पाठराखिण अर्थात ‘चंदा’ची भूमिका दीप्ती सोनवणे यांनी साकारली होती. लहानपणापासूनच दिप्तीला कालाक्षेत्राची ओढ होती. आजोबांचा कलेचा वारसा पुढे तीने जपलेला पाहायला मिळतो. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे, नृत्य सादर करणे, नाटकात भाग घेणे यातूनच पुढे अभिनयाची आवड निर्माण होत गेली. बीएस्सीची पदवी मिळवल्यानंतर तिने हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स केला यातून के ई एम सारख्या हॉस्पिटलमध्ये काही काळ नोकरी केली. दरम्यान एका मोठ्या कंपनीचे मॅनेजर असलेल्या विशाल क्षीरसागर यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. ‘लफडा सदन’ या नाटकातून तिचे रंगभूमीवर पदार्पण झाले. डार्लिंग डार्लिंग, पती सगळे उचापती, साईबाबा, सखी एक विश्वास, आयटमगिरी, पाकिटमार अशा नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. परंतु या सर्वातून तुझ्यात जीव रंगला मालिकेत तिने साकारलेली चंदाची भूमिका अधोरेखित करणारी ठरली.