तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील लोकप्रिय ठरलेली ऑनस्क्रिन जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार बनली. राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली. अक्षयाच्या ग्रहमख विधींपासून ते मेहंदी, हळदी, लग्न, रिसेप्शन, हार्दिकच्या घरी झालेली सत्यनारायण पूजा इथपर्यंत हार्दिक – अक्षयाच्या लग्नाचा सोहळा सोशलमीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनी अनुभवला. आता लग्नं झालं, पूजा झाली मग ही जोडी हनिमूनला कुठं जाणार या चर्चेलाही उधाण आलं. पण नुकताच अक्षयाने हार्दिकसोबत पारंपरिक लुकमधला फोटो शेअर केला आहे. लग्नानंतर आठव्या दिवशी हार्दिक आणि अक्षया ही जोडी महाराष्ट्रातील एका खास ठिकाणी गेल्याचे दिसून आले. पहा दोघांनी काय प्लॅन केला आहे ते. हार्दिक आणि अक्षय यांचा पहिला फोटो शेअर केला त्यामध्ये अक्षया आणि हार्दिक कारमध्ये बसलेले दिसत आहेत.

या फोटोमध्ये अक्षया मोरपंखी रंगाच्या चंदेरी साडीमध्ये आहे तर हार्दिकने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरी सलवार घातली आहे. अक्षयाच्या गळ्यातील मोठं मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू पाहता ही जोडी देवदर्शनाला निघाली असल्याचा अंदाज चाहत्यांना आलाच. त्यानंतर थेट नाशिकमधील वणीतील सप्तश्रृंगीच्या दर्शनाला अक्षया आणि हार्दिक गेल्याचं समोर आलं. लग्नानंतर सध्या ही जोडी देवदर्शन करत आहे. सप्तश्रृंगी देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेच्या शूटिंगसाठी हार्दिक नाशिकमध्ये मुक्कामाला होता. त्यामुळे हार्दिकची अशी इच्छा होती की लग्नानंतर तो अक्षयासोबत देवीच्या दर्शनाला येईल. मेहंदी, हळद, लग्न सोहळा, उखाणे, रिसेप्शन या सर्व कार्यक्रमांतील फोटोंची सोशल मीडियावर खूपच चर्चा होती. लग्नानंतर या हार्दिकच्या घरी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचे फोटोही या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे या दोघांच्या लग्नसोहळ्याचे क्षण त्यांच्या चाहत्यांनी या फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवले. तसंच या नवदाम्पत्याला नवीन आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. अक्षयानं हे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचाचा वर्षाव केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना लग्नाच्या तसंच त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अक्षयानं तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक छोटासा व्हिडीओ शेअर केला होता.

तो पाहून हे दोघे लग्नानंतर कुठेतरी स्पेशल ठिकाणी फिरायला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये फक्त अक्षया देवधर दिसत असून तिच्या मागे समुद्र दिसत आहे. यावेळी तिने सुंदर असा काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून अक्षयाचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे. तसंच लग्नानंतर अक्षया आणि हार्दिक हे दोघेही कॉफी डेटवर गेले होते. अक्षयानं त्याचा ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. यंदाच्यावर्षी अक्षयतृतीयेला हार्दिक आणि अक्षया यांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर दोघांच्याही लग्नाच्या तारखेकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर साखरपुड्यानंतर सात महिन्यांनी हार्दिक आणि अक्षया बोहल्यावर चढले आणि चाहत्यांनाही आनंद झाला. अक्षयाने तिच्या लग्नासाठी अनेक गोष्टी खास केल्या होत्या. अक्षयाने तिच्या मेंदीमध्ये हार्दिकचं नाव नव्या अंदाजात लिहिलं होतं. तर अक्षयाची लग्नाची ओढणीही स्पेशल होती, ज्या ओढणीवर सदा सौभाग्यवती भव अशी अक्षरे विणण्यात आली होती.