स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, फुलाला सुगंध मातीचा, सहकुटुंब सहपरिवार अशा नव्या दमाच्या मालिकांनी प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम आणि कीर्तीची जोडी देखील प्रेक्षकांना खूपच भावली आहे. अभिनेता हर्षद अतकारी आणि अभिनेत्री समृद्धी केळकर यांच्या अभिनयातून या भूमिका अधिकच खुलत गेलेल्या पाहायला मिळाल्या. या मालिकेत आता लवकरच एका कलाकाराची एन्ट्री होत आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात…

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्ती आणि शुभम पाककलेच्या स्पर्धेसाठी मुंबईला रवाना होत आहेत. मध्येच त्यांची गाडी बंद पडते…यावेळी किरणचे पात्र त्यांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे. हा किरण कोण आहे हे बहुतेकांनी ओळखले असेलच. किरणचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “शेखर फडके” शेखर फडके हा मराठी सृष्टीत एक विनोदी कलाकार म्हणून चांगलाच ओळखला जातो आपल्या हलक्या फुलक्या विनोदी भूमिकांनी त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. लहानपणापासूनच शेखरला अभिनयाची आवड होती ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्याने बालपणीचे राजाराम साकारले होते. पुढे कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असताना ‘मृगजळ’ या स्पर्धेत सहभाग दर्शवला या स्पर्धेत त्याला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे परीक्षकांनी त्याला पहिल्यांदा व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी दिली.

तू माझा सांगाती या लोकप्रिय मालिकेतूनही त्याने ज्ञानेश्वरांच्या वडिलांची म्हणजेच विठ्ठलपंतांची भूमिका साकारली होती. तर सरस्वती मालिकेतील त्याच्या आगळ्या वेगळ्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. सरस्वती या मालिकेतून त्याने भिकुमामा साकारला होता. मालिकेतला हा भिकुमामा खलनायक जरी असला तरी त्याच्या विनोदी पैलूमुळे तो अधिकच उठावदार दिसला होता. विठुमाऊली, प्रेम पॉईजन पंगा अशा मालिकेतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. विठुमाऊली मालिकेतूनही त्याने विरोधी भूमिका दर्शवली होती त्यावेळी या भूमिकेसाठी त्याला एका आज्जीचा मारही खावा लागला होता. ‘पुंडलीकाला का त्रास देतोस’ असे म्हणून त्या आज्जीने शेखरला काठीने चोप दिला होता. ही आठवण स्वतः त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. नुकताच तो फुलाला सुगंध मातीचा मालिकेत किरणच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहे. या मालिकेत तो पाककला स्पर्धेचा जज म्हणून आपली भूमिका बजावणार आहे.