आई कुठे काय करते ह्या मालिकेत नुकताच अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट झाला आहे. अरुंधती आता तिचे आयुष्य नव्याने जगण्यास सज्ज झाली आहे. यासाठी ती तिच्या माहेरी आपल्या आईकडे राहायला गेली आहे. अनिरुद्ध सोबत झालेल्या घटस्फोटानंतर अरुंधती आपले मंगळसूत्र अनिरुद्धकडे सुपूर्त करते. मंगळसूत्र आता कोणालाही दाखवायला घालायची गरज नाही, आता यावर माझा काही हक्क नाही… असे म्हणणारी अरुंधती कुठेतरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसली.

परंतु हे सर्व करत असताना तिला कोणत्या दिव्यातून जावे लागत हे तिच्या भावनांवरून समजत आहे. आपल्या कुटुंबापासून पर्यायाने आपल्या मुलांपासून दूर जात असताना तिला होणाऱ्या यातना किती कठीण असतील याची प्रचिती प्रत्येक आईला अरुंधतीकडे पाहताना आली. मागील काही भागांमध्ये यश आणि गौरीच्या साखरपुडयावेळी घडलेला एक प्रसंग खूपच व्हायरल झाला होता. मूल होणं न होणं या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा सलग तीन दिवस चाललेला प्रसंग मालिकेत दर्शवण्यात आला. या यशाचे संपूर्ण श्रेय मालिकेचे कलाकार , लेखक आणि दिग्दर्शका यांना मिळाले होते. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या अभिनयाने चोख बजावली आहे त्याचमुळे तिचे कौतुक सर्वच स्तरातून केले जात आहे. मागील काही दिवसांपासून अरुंधती साकारत असताना मनात काय भावना दाटून येतात हे तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे तिच्या ह्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या सजग अभिनयाचे कौतुक केले आहे. पाहुयात ती आपल्या पोस्टमध्ये नेमकी काय म्हणाली ते…

” २५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला… तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं …. आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून , नव्याने सुरुवात करणं… हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे….किती वेदनेतून जात असेल ती…. हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय..असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवतं की अरुंधती मध्ये सगळे किती गुंतलेत….पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात आणि सर्व सहकलाकारांच्या मी कायम ऋणी असेन. ” आई कुठे काय करते मालिकेमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर प्रसिद्धीच्या झोतात नाही तर त्या भूमिकेत गुंतल्या देखील असल्याचं त्यांनी ह्यावेळी नमूद केलेलं पाहायला मिळतंय. अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…