स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेचे चित्रीकरण एका नव्या जागी करण्यात येत आहे देशमुख कुटुंब आपल्या गावी पोहोचले असून तिथली धमाल मस्ती आता आपल्याला पुढील भागात अनुभवायला मिळणार आहे. लवकरच गावी असलेल्या देशमुखांच्या घरी अभि आणि अनघाचा साखरपुडाही पार पडणार आहे. उद्याच्या भागात तर अनिरुद्ध, यश , ईशा आंब्याच्या बागेत आंबे तोडताना दिसणार आहेत मात्र आमराईचा मालक तिथे काठी घेऊनच सगळ्यांची धावपळ करून सोडणार असल्याने ही मस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

आई कुठे काय करते ही आईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकर हिने अरुंधतीची भूमिका तिच्या अभिनयातून सजग केली आहे हेच या मालिकेचे खरे यश म्हणावे लागेल. याशिवाय यश, ईशा, अभिषेक यांची मिळालेली साथ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसते. त्यामुळे मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढला आहे. परंतु लवकरच या मालिकेतील एक पात्र काही दिवसांसाठी ब्रेक घेणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांची लेक म्हणजेच ईशा काही दिवसांसाठी एका दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ईशाचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “अपूर्वा गोरे” हिने. अपूर्वा गोरे लवकरच सब टीव्ही वरील “वागळे की दुनिया” या मालिकेत एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. वागळे की दुनिया ही हिंदी मालिका अभिनेता सुमित राघवन अभिनित करत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे यात आता अपूर्वाला देखील हिंदी मालिकेत झळकण्याची संधी मिळणार आहे.

अपूर्वा या मालिकेत किती दिवस काम करणार आहे हे अजून स्पष्ट झाले नसले तरी ती पुन्हा आई कुठे काय करते मालिकेत परतणार का ? हा प्रश्न तिच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. अपूर्वा आई कुठे काय करते मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. अपूर्वा मूळची चंद्रपूरची इथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते तर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असताना तिने अनेक एकांकिका स्पर्धांमधून सहभाग दर्शवला यात तिने अभिनित केलेल्या एका नाटकाला सिम्बॉइसिस करंडकचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. मालिकेअगोदर तिने ती फुलराणी, हाय टाइम सारख्या नाटक आणि मिनी सिरीजमधून काम केले होते. आई कुठे काय करते ही अपूर्वाची पहिलीच मालिका आणि आता ती चक्क हिंदी मालिकेतही झळकणार त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. परंतु मालिकेतली ईशा कायमची एक्झिट घेणार की ती पुन्हा परतणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे. तुर्तास अपूर्वाला या नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…