अभिनयासोबत मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्री व्यवसाय क्षेत्रातही गुंतलेल्या पाहायला मिळतात. नुकतेच रात्रीस खेळ चाले मालिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील सातारा जिल्ह्यात साड्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. साड्यांसोबत तिच्या नावाने आर्टिफिशिअल ज्वेलरीचा देखील व्यवसाय आहे. अपूर्वा नेमळेकर हिच्या प्रमाणे निवेदिता सराफ, अभिज्ञा भावे , तेजस्विनी पंडित, आरती वाडगबाळकर ह्यांचाही कपड्यांचा ब्रँड कलासृष्टीत खूपच प्रसिद्ध आहे. लवकरच लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे देखील व्यवसाय क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाली आहे.

स्वानंदी तीची खास मैत्रीण सायली गवळी हिच्या मदतीने “Ehaa’s creation” या नावाने कपड्यांचा व्यवसाय सुरू करत आहे. यात प्रामुख्याने एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरिअल्स, दुपट्टा आणि विविध प्रकारचे दागिने अशा भरघोस कलेक्शनचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिक डिटेल्स देऊ असे स्वानंदी म्हणते. याचबरोबर तिने या नव्या व्यवसायासाठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागितल्या आहेत. स्वानंदी बेर्डे हिने ‘धनंजय माने इथेच राहतात का ‘ या नाटकातून नाट्य क्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते. या नाटकातून तिने सौ माने ची भूमिका निभावली होती. अभिनय आणि व्यवसाय अशा दोन्ही जबाबदाऱ्या ती पेलताना दिसणार आहे. स्वानंदीची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे या देखील अभिनयासोबत आपला स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळताना दिसत आहेत. पुण्यातील बावधन परिसरात “चख ले ” या नावाने त्यांचे हॉटेल आहे. वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणे याच आवडीमुळे प्रिया बेर्डे यांनी ह्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी स्वानंदी ही देखील आता व्यवसाय क्षेत्रात उतरत असल्याने प्रिया बेर्डे खूपच खुश झाल्या आहेत. प्रिया बेर्डे यांनी देखील आपल्या लेकीला या व्यवसायानिमित्त पाठिंबा दर्शवत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. स्वानंदी बेर्डेला तिच्या ह्या नव्या व्यवसायानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन….