झी युवा वरील “बापमाणुस” या मालिकेतील अभिनेत्री “अभिलाषा पाटील” यांचे काल दुःखद निधन झाल्याचे समोर आले आहे. बापमाणुस याच मालिकेत काम करत असलेल्या अभिनेत्री पल्लवी पाटील हिने ही बातमी सोशल मीडियावर कळवली आहे. पल्लवी पाटील हिने या मालिकेत निशाची भूमिका साकारली होती तर अभिलाषा पाटील यांनी तिच्या आईची भूमिका बजावली होती. त्यामुळे पल्लवीसोबत त्यांचे छान बॉंडिंग जुळून आले होते. त्यांच्या अशा जाण्याने पल्लवीला खूप दुःखही झाले असल्याचे म्हटले आहे.

अभिलाषा पाटील यांनी नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत अगदी बॉलिवूड चित्रपटातूनही त्यांनी काम केले आहे. छिछोरे, मलाल, गुड न्युज सारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा ‘प्रवास’ चित्रपट, बायको देता का बायको, ते आठ दिवस, तुझं माझं अरेंज मॅरेज, श्री गुरुदेव दत्त मालिका, नुकतीच आलेली रिलायन्सची ऍड यांमधून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय ‘शिवसोहळा’ या नंदेश उमप यांच्या कार्यक्रमात त्यांना जिजाऊंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. अभिलाषा पाटील यांना आयुष नावाचा एक मुलगाही आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते मिलिंद अधिकारी यांनी तर त्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या खास आठवणींना आपल्या शब्दातून उजाळा दिलेला पाहायला मिळाला. त्या अशा आपल्यातून अचानक निघून गेल्या हे अजूनही त्यांच्या सहकलाकारांना न पटणारे आहे…. पल्लवी पाटील यांनी त्यांच्या शब्दात श्रद्धांजली देत म्हटले आहे की …”खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. baapmanus ला आपण भेटलो होतो… आई होतीस माझी. . ” नुसतं enjoy” असं म्हणून काम करायचीस … भूत काळात तुला संबोधताना त्रास होतोय…. जिथे असशील तिथे ही खूप कामं करत राहा… ” अभिलाषा पाटील यांना आमच्या संपुर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली….