Home Entertainment येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “शकूची” रिअल लाईफ स्टोरी

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “शकूची” रिअल लाईफ स्टोरी

1935
0
yeu kashi tashi mi nandayla shaku
yeu kashi tashi mi nandayla shaku

आजच्या घडीला अल्पावधीतच लोकप्रियता गाठलेली झी मराठी वाहिनीची मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. मुळात शुभांगी गोखले, दीप्ती केतकर, उदय साळवी, अन्वीता फलटणकर , शाल्व किंजवडेकर, अदिती सारंगधर यांच्या सहजसुंदर अभिनयातून ही मालिका अधिकच खुलत चालली आहे. मालिकेतील शुभांगी गोखले यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही होत आहे, आज त्यांच्या रिअल लाईफबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… शुभांगी गोखले यांचे लग्नापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई . २ जून १९६८ साली खामगाव येथे एका आदर्श कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

shubhangi gokhale husband

मराठी लेखिका, कवयित्री, संतसाहित्य अभ्यासक ‘विजया संगवई’ या शुभांगी गोखले यांच्या आई तर त्यांचे वडील ‘व्यंकटेश संगवई’ हे निवृत्त न्यायाधीश त्यामुळे बालपणापासूनच शुभांगी गोखले यांच्यावर चांगले संस्कार होत गेले. वडील न्यायाधिश असल्याने महाराष्ट्रातील तब्बल तेराहुन अधिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या बदल्या होत गेल्या तसतसे त्यांचे कुटुंबही त्यांच्यासोबतच बदलीच्या ठिकाणी जात . त्यामुळे त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण तेरा वेगवेगळ्या शाळांमधून झाले आहे. त्यानंतर मात्र औरंगाबाद जिल्ह्यात त्यांचे कुटुंब स्थिरावले आणि इथेच संगवई कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. शिक्षणासोबतच अभिनय आणि नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. राज्यनाट्य स्पर्धेत त्यांनी बसवलेल्या ‘खजिन्याची विहीर’ या नाटकाला प्रथम पुरस्कार मिळाला. नाटकात काम करत असताना मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली. दरम्यान दोघांनी नाटक, मालिकेतून एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. मिस्टर योगी ही दोघांनी एकत्रित अभिनित केलेली हिंदी मालिका खूप गाजली. पुढे त्यांच्या दोघांतील ओळखीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले.

shubhangi gokhale daughter

२७ जुलै १९९३ रोजी त्यांच्या एकुलत्याएक कन्येचा अर्थात ‘सखी’चा जन्म झाला. घरसंसार आणि सखीच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळता यावी यामुळे अभिनयापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. दरम्यान मोहन गोखले यांनी हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपला चांगलाच जम बसवला. मात्र २९ एप्रिल १९९९ रोजी चेन्नई येथे ‘हे राम’ चित्रपटादरम्यान हार्टअटॅकने मोहन गोखले यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत शुभांगी गोखले यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, हम है ना, डॅडी समझा करो, लापतागंज, राजा राणीची गं जोडी, झेंडा, क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला. त्यांच्या सालस आणि सोज्वळ भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यांची मुलगी सखी गोखले हीनेही आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिल दोस्ती दुनियादारी, पिंपळ, रंगरेझ, तुकाराम, अमर फोटो स्टुडिओ अशा चित्रपट ,मालिका आणि नाटकांतून अभिनय साकारला. २०१९ साली सखी गोखले सहकलाकार असलेल्या सुव्रत जोशी याच्याशी विवाहबद्ध झाली. अभिनया सोबतच सखी फोटोग्राफीची आपली आवड जोपासत आहे पुण्यातील भारती विद्यापीठ येथून तिने फाईन आर्टस् फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. नुकत्याच सुरू केलेल्या “Aayaam” या संस्थेची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सखी आपली नव्याने ओळख निर्माण करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here