सासू सुनेच्या मालिकांना कंटाळून आता लोक अध्यात्मिक कार्यक्रमांकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. महामारीच्या काळातही रामायण पाहणाऱ्यांची संख्या खूपच जास्त होती. उगाचच काहीतरी पाहण्यापेक्षा आता प्रेक्षक वर्ग आपल्याला काहीतरी ज्ञान घेता येईल आणि मानसिक समाधान मिळेल अश्याच मालिकांना पसंती दर्शविताना पाहायला मिळत आहेत. कलर्स मराठीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि अध्यात्मिक मालिका देखील खूपच सुंदर आहे. मालिकेतून खूप काही शिकण्यासारखं आणि आत्मसात करण्यासारखं आहे. मालिकेत आता बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघालेले पाहायला मिळत आहेत. मालिकेत बाल शंकर महाराज साकारणाऱ्या कलाकाराला विशेष पसंती मिळालेली पाहायला मिळते. बाल शंकर महाराज हि भूमिका बालकलाकार आरुष डेबेडकर याने साकारली आहे.

‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत बालकलाकार आरुष डेबेडकर सह अतुल आगलावे, पल्लवी पटवर्धन, प्रसाद बेडेकर, सोनाली पाटील आणि उमा हृषीकेश यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. ह्या मालिकेत सर्वच कलाकार आपल्या अभिनयाने हि मालिका उत्तम चालवताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत चिमणाजी आणि पार्वती या दांपत्याने बालशंकर महाराजांचा सांभाळ केलेला पाहायला मिळतो. मलीयेत पार्वतीची भूमिका अभिनेत्री “उमा ऋषिकेश” हिने साकारली आहे. उमा ऋषिकेश हिला तुम्ही ह्यापूर्वी देखील पाहिलंच असेल. ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. यानंतर झी मराठी वाहिनीच्या “अग्गबाई सुनबाई” ह्या मालिकेत देखील उमाने प्रमुख भूमिका साकारली होती. उमा ऋषिकेश हिची आई शिक्षिका असल्यामुळे शिक्षणासोबतच संस्कार देखील तिला बालवयापासूनच मिळत गेले. आई आणि वडिलांनी लहानपणापासूनच तिला कथ्थक आणि शास्त्रीय संगीत शिकण्यावर भर दिला. शालेय जीवनात अनेक स्टेज शो मध्ये तिने आवर्जून भाग घेतला. पुढे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने नाट्यसंगीताचा डिप्लोमा देखील केला. ठाणे सेंटरमधून नाट्यसंगीताच्या सादरीकरणात उमा प्रथम आली आणि पारितोषिक तिला प्रशांत दामले यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी तिला “संगीत संशयकल्लोळ” ह्या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी विचारणा केली.

“संगीत संशयकल्लोळ” या नाटकात रेवती साकारताना सहकलाकार म्हणून राहुल देशपांडे सरांसारखे दिग्गज कलाकार लाभणार ह्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ह्या नाटकाचे भारतातच नव्हे तर अनेक देशांत प्रयोग झाले. ह्या नाटकाने उमाळा खूप प्रसिद्धी मिळाली. या नाटकानंतर उमाने मानसशास्त्र विषयात देखील पदवी प्राप्त केली. त्यानंतर उमाच लग्न झालं. कलासृष्टीत नावाजलेले पेंढारकर घराण्याची ती सून झाली. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर”. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल कि प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून आहे. भालचंद्र पेंढारकर यांनी सत्तेचे गुलाम, शाब्बास बिरबल शाब्बास, आनंदी गोपाळ, दुरितांचे तिमिर जावो, स्वामिनी अशी अनेक नाटके केली. उमाचा पती “ऋषिकेश पेंढारकर” हे आर्किटेक्ट आणि इंटेरिअर डिझायनर आहेत. ऋषिकेश पेंढारकर याला देखील संगीताची खूप आवड आहे.