मागील काही दिवसांपूर्वी कोकण, कोल्हापूर या ठिकाणांना पुराने विळखा घातला होता. दरवेळीप्रमाणे ह्याही वेळी पुराने अनेकांचे नुकसान केले. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक मदतीचे हात पुढे आले आणि अजूनही येत आहेत. मराठी सृष्टीतील कलाकारांनी देखील खारीचा वाटा म्हणून जमेल ती मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर नेहमीप्रमाणे अभिनेत्री दीपाली सय्यद हिची देखील भरगोस मदत या पूरग्रस्तांना मिळाली. कोल्हापूरमध्ये गेल्या वेळी पूर आला होता त्यावेळी दीपाली सय्यद हिने तिच्या फौंडेशनमधून तिथल्या भागातील काही मुलींच्या लग्न खर्चाची जबाबदारी सांभाळली होती.

आणि यावेळी देखील कोकण कोल्हापूर पूरग्रस्त भागांना भेट देऊन तिथली परिस्थितीची पाहणी करून तब्बल १० कोटींची मदत करणार असल्याचे जाहीर केली. दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ही मदत करणार असल्याचे तिने सांगितले होते. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे पुरस्थिती जाणून घेताना पूजा चव्हाणच्या कुटुंबाची दीपाली सय्यदने भेट घेतली. पूजा चव्हाणचे लग्न ठरले होते पूजाच्यासाठी तिच्या आई वडिलांनी काही दागिने खरेदी केले होते. हे दागिने पूजाच्या वडिलांनी जवळच राहत असलेल्या भरत सुतार यांच्या घरात ठेवले होते. परंतु, पुरामुळे त्यांच्या घरावर दरड कोसळली आणि त्यांचे संपूर्ण घरच दरडीखाली झाकून गेले. आयुष्यभर काबाडकष्ट करून पूजाच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने पुरामुळे जमिनीखाली गेले हे दीपाली सय्यदला जेव्हा समजले तेव्हा त्यांनी त्या गावात जाऊन पूजाची आणि तिच्या कुटुंबाची भरत घेतली. पूजाच्या लग्नाचा सर्व जबाबदारी मी पेलते असे दिपालीने त्यांना आश्वस्त केले आहे. पूजाच्या लग्नाची जबाबदारी दीपाली सय्यदने पेलली असल्याची वार्ता आता सगळीकडे पसरली आहे. प्रसार माध्यमातूनही दीपाली सय्यदचे आता कौतुक होताना दिसत आहे.