तेजपाल वाघ यांची झी मराठी वाहिनीवर “कारभारी लयभारी” ही मालिका प्रसारित होत आहे. निखिल चव्हाण याने राजवीर तर आणि अनुष्का सरकटे हिने प्रियांकाची प्रमुख भूमिका बजावली आहे. तर दुसऱ्या बाजूला जगदीश पाटील आणि शोना आणि गंगा. मालिकेतील सोना मॅडम सोबतचे “गंगा” हे पात्र देखील खूपच भाव खाऊन जाताना दिसते. कारण गंगा चे पात्र विरोधी भूमिकेच्या बाजूने असले तरी ते नेहमीच नायक आणि नायिकेची बाजू घेताना दिसते. परंतु ही गंगा नेमकी आहे तरी कोण ? तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही नक्कीच गहिवरून जाल.

कारण गंगा हे पात्र साकारणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात ट्रान्सजेंडर आहे. हो अगदी पूर्वीच्या चित्रपटातून गणपत पाटील सारख्या भूमिका जशा अजरामर झाल्या त्याचप्रमाणे मालिका, चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून सूत्रसंचालक म्हणून ही गंगा आज आपले स्थान या कला क्षेत्रात निर्माण करताना दिसत आहे. झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन रिऍलिटी शोमधून होस्ट म्हणून गंगा ने मराठी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. मराठी सृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा म्हणून आज गंगाला आपली वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. परंतु हे साध्य होण्यामागे अपार मेहनत, जिद्द आणि लोकांच्या टिकेलाही तिला सामोरे जावे लागले होते हे वेगळे सांगायला नको. अगदी लहानपणापासूनच गंगाला नेहमी हिनवले जात असे. गंगा चे खरे नाव आहे “प्रणित हाटे ” परंतु प्रणितला आज गंगा म्हणूनच ओळखले जाते. मुंबईतील विद्या विहार परिसरात तीचे बालपण गेले. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला येऊनही तीची वर्तवणूक मात्र मुलींसारखीच असायची त्यामुळे तू बायल्या आहेस, छगन आहेस म्हणून मुलं नेहमी तीला चिडवायचे, मारायचे, पॅन्ट खाली ओढायचे . या सर्व गोष्टींमुळे मी पुरती खचून गेले होते असे ती म्हणते. घरी कसं सांगायचं ? ,त्यांना सांगितलं तर घरचे मलाच ओरडतील मारतील या भीतीने मी त्यांच्याशी काहीच बोलत नसे.

लहानपणी मी पहिल्यांदा हातावर मेहेंदी काढली होती तोच हात धरून भावाने माझ्या कानाखाली वाजवली होती. शाळेतही असताना मधल्या सुट्टीच्या वेळी टॉयलेटला गेल्यावर मुलं चिडवायचे, मारायचे यावेळीही मी खूप घाबरायचे परंतु एक दिवस माझा राग अनावर झाला आणि मी कुठलाही विचार न करता त्या मुलाच्या कानाखाली वाजवली. हे धाडस केल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास निर्माण झाला. असे धाडस केले तरच आपला निभाव लागणार हे गंगाला समजले. पुढे घरच्यांचाही गंगाला पाठिंबा मिळत गेला. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे गंगा अभिनय, नृत्य आणि सूत्रसंचालन अशा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करताना दिसत आहे. झी युवा डान्सिंग क्वीन मध्ये येण्यापूर्वी गंगा ने वजुद आणि विग या चित्रपट आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. कारभारी लयभारी ही तिने अभिनित केलेली पहिली वहिली मराठी मालिका. या मालिकेतून गंगाला तिच्या या भूमिकेला योग्य तो वाव मिळताना दिसत आहे. पुढे जाऊन हे पात्र आणखी खुलत जाईल अशी अपेक्षा देखील आहे. गंगा उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे तिच्या डान्सच्या व्हिडिओजना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळताना दिसते. गंगाला आज मराठी सृष्टीत आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करता आले आहे भविष्यात अशी अनेक कामं तिला मिळत राहो हीच सदिच्छा….