मराठी सृष्टीला लाभलेली एक सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणजे डॉ निशिगंधा वाड होय. नुकतीच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी आपल्या युट्युब चॅनलवरून निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली. अगदी सुरुवातीपासूनच त्यांची ही मुलाखत केवळ ऐकत राहावी आणि ती शक्य तेवढी आत्मसात करावी अशीच होती. ही मुलाखत ऐकताना प्रत्येकवेळी केवळ शब्दांचेच नव्हे तर ज्ञानाचेही भांडार निशिगंधा वाड यांच्या आंतरमनात भरभरून पेरले आहे याची जाणीव क्षणाक्षणाला होत राहते. या मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल खुप काही सांगितले आहे . मुलाखतीच्या शेवटी त्यांच्यासोबत घडलेल्या एका किस्स्याने अक्षरशः डोळ्यात पाणीच आणले.

मनाच्या कुपीत अत्तरासारखा राहिलेला हा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की एकदा शूटिंग आटोपल्यावर मी त्या कॅफेमध्ये लिहायला बसले तर बाहेरील बाजूस एक वृद्ध भिकारी खाण्याचा अभिनय करत होता. हे पाहून निशिगंधा वाड यांनी कॅफेतील एक बर्गर विकत घेतला आणि त्या वृद्ध व्यक्तीला ‘आवडेल तुम्हाला खायला?’ असे नम्रपणे विचारले. वृद्ध व्यक्ती ‘आवडेल’ असे म्हटल्यावर निशिगंधा वाड तिथून निघाल्या पण त्याक्षणी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन ‘माझ्या समोर बसून खाल?’ अशी विचारणा केली. त्यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की ‘मला आत नाही येऊन देणार… ‘ अशी व्यक्ती कॅफेत आल्यावर इतर लोकं येणार नाहीत शिवाय तिथे असलेली व्यक्ती मालक नसेल किंवा त्या कर्मचाऱ्यांवर बंधनांचा अंकुश असेल हा विचार करून ‘माझ्या टेबलवर भिंतीकडील एका कोपऱ्यात त्या व्यक्तीला बसु दे ,पण बसु दे ‘ अशी विनंती निशिगंधा वाड यांनी केली. परवानगी घेतल्यावर कॅफेच्या आत एका कोपऱ्यात त्या वृद्ध व्यक्तीला बसवून त्यांनी त्याला पोटभर जेवू घातले शिवाय काही पैसेही देऊ केले पण त्यांनी ते ‘एवढं पुरेस आहे’ म्हणत पैसे घेण्यास नकार दिला …. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता…

मला तो क्षण एकत्र साजरा करायचा होता असे म्हणून भावनिक झाल्या. कॅफेच्या बाहेर आल्यावर त्या व्यक्तीने बोलताबोलता आपला जीवनप्रवास सांगितला की, ‘कुठेच नोकरी मिळाली नाही.. घर सुटलं..नातेवाईक सुटले… रस्त्यावर आलो..रस्त्यावरच उरलो…’ असे म्हणत निशिगंधा वाड यांच्या हातावर त्यांनी एक टिश्यू पेपर ठवेला आणि ‘मी गेल्यावरच वाच’ असे सांगितले. निशिगंधा वाड ज्या टेबलवर लिहिण्यासाठी बसल्या होत्या तिथल्याच पेनने त्या व्यक्तीने टिश्यूवर काहीतरी लिहिले होते. ती व्यक्ती गेली तशा निशिगंधा वाड गाडीत बसल्या आणि तो टिश्यू उघडून पाहिला तर त्यात लिहिले होते, ‘ आज मी आ त्म’ ह ‘त्या करणार होतो पण आता करणार नाही…’ हे वाक्य जेव्हा त्या बोलल्या तेव्हा यांच्यासह सुलेखा तळवलकरही खूपच भावुक झाल्या आणि दोघींच्याही डोळ्यातून अश्रू ढळू लागले… अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवे अशी प्रामाणिक प्रतिक्रिया व्यक्त करत ‘ज्यांना परमेश्वराने भरभरून दिलं आहे, ज्यांची ओंजळ भरलेली आहे, मला असं वाटतं हे कर्तव्य त्यांच्याकडे परमेश्वराने दिलं आहे की तुमचं पोट भरलंय ना ढेकर देऊ नका…घास वाढा कोणाच्यातरी पानात….’