मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्याबद्दल आज बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव होते “नयन भडभडे”. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील चिकीत्सक आणि कमळाबाई शाळेमधून झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या क्षेत्रापासून दूर राहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. ८ वी इयत्तेत प्रवेश मिळवल्यावर त्यांना आंतरशालेय नाट्यस्पर्धेतून अभिनय साकारण्याची संधी मिळाली होती.

मधल्या काळात त्या बँकेत नोकरी करू लागल्या परंतु अभिनयाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी बँकेतील नोकरीला त्यांनी रामराम ठोकला. मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते विवेक लागू यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्यानंतर रिमा लागू याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. विवेक लागू हे देखील बँकेतच नोकरी करत होते. परंतु त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. पुढे अभिनयाचा त्यांचा हा प्रवास व्यावसायिक नाटक, मराठी, हिंदी चित्रपटापर्यंत यशस्वीपणे घेऊन गेला. त्यांच्या रूपाने मैने प्यार किया, कुछ कुछ होता है, दिवाने, दिल्लगी, येस बॉस, हम साथ साथ है अशा अनेक चित्रपटातून बॉलिवूडमधील मॉडर्न आई उदयास आली होती. १८ मे २०१७ रोजी रिमा लागू यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या ह्या निधनाच्या बातमीने कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. आजही त्यांनी साकारलेल्या मालिका आणि चित्रपटातील काम आवर्जून घेतले जाते. चित्रपट सृष्टीत आजही त्यांना सलमान खानची आई म्हणून संबोधले जाते. आता आपण त्यांच्या आई आणि परिवाराबद्दल माहिती जाणून घेऊयात..

रिमा लागू यांच्या आई “मंदाकिनी भडभडे” या देखील मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. अपराध, वाट चुकलेले नवरे, अन्नपूर्णा, अरे संसार संसार, नवरे सगळे गाढव, मुंबईचा फौजदार अशा अनेक मराठी चित्रपट तसेच सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, भटाला दिली ओसरी अशा दर्जेदार नाटकांतून भूमिका साकारल्या. १९४९ च्या सुमारास त्यांनी सीआयडी कार्यालयात काही काळ नोकरी केली होती. मंदाकिनी भडभडे यांचेही वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांची नात म्हणजेच रिमा लागू यांची मुलगी “मृण्मयी लागू” ही आपल्या आई आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून भूमिका साकारू लागली. मुक्काम पोस्ट लंडन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, हॅलो जिंदगी या चित्रपटातून मृण्मयी प्रेक्षकांसमोर आली. नुकताच येऊन गेलेला तापसी पन्नू अभिनित ‘थप्पड’ या बॉलिवूड चित्रपटाचे लेखन मृण्मयीने केले होते. डिसेंम्बर २०१४ साली असिस्टंट डायरेक्टर असलेल्या विनय वायकुळ सोबत ती विवाहबंधनात अडकली होती. रिमा लागू यांनी ‘होम स्वीट होम’ हा अखेरचा मराठी चित्रपट साकारला होता. बॉलिवूडची एक उत्कृष्ट आई म्हणून त्यांना कायम या सृष्टीत ओळखले जाणार यात शंका नाही. रिमा लागू यांच्या या स्मृतीस विनम्र अभिवादन करूयात…