झी मराठीवरील पाहिले न मी तुला मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत समर जहागीरदार मॅनेजर नसून सिक्युरिटी गार्ड असल्याचे नुकतेच समोर आले आहे तर तो आपल्या पत्नीला भेटायला झोपडपट्टीत असलेल्या आपल्या घरी गेलेला पाहायला मिळत आहे. मालिकेतला हा मोठा ट्विस्ट समरच्या आयुष्याला आणि पर्यायाने मनू आणि अनिकेत च्या संसारात काय मोठ्या घडामोडी घडवून आणणार हे पाहणे आता रंजक होणार आहे. तुर्तास मालिकेतील हा ट्विस्ट नवखी अभिनेत्री तेजश्री या नावाभोवती गुरफटलेला आहे. ही तेजश्री नक्की आहे तरी कोण ते जाणून घेऊयात…

पाहिले न मी तुला या मालिकेत समरच्या पत्नीची एन्ट्री होत आहे. समर सिक्युरिटी गार्ड असून तो अतिसामान्य माणूस दर्शवल्याने त्याच्या पूर्वायुष्या बाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की हा समर नक्की आहे तरी कोण आणि तो पुढे काय काय खेळी करणार आहे?… या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच मालिकेतून कळतील मात्र मालिकेत समरची पत्नी जिने साकारली आहे तिच्याबद्दल जाणून घेऊयात.. समरची पत्नी साकारणारी ही नवखी अभिनेत्री आहे “तेजश्री मुळे”. तेजश्री मुळे ही उत्कृष्ट नृत्यांगना असून अभिनेत्री आणि लेखिका सुद्धा आहे. रामनिवास रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे तर नालंदा डान्स रिसर्च सेंटर नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती अनेक मोठमोठ्या मंचावर आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसते. महेश कोठारे यांच्या विठू माऊली या मालिकेतून तिचे छोट्या पडद्यावर आगमन झाले होते. शिवाय अनोळखी, अ कॉन्व्हरसेशन, द सेकंड सेक्स, खिडकी अशा चित्रपट नाटकांतून तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मिस ठाणे १८ च्या स्पर्धेत तिने पार्टीसिपेट केले होते त्या स्पर्धेत “मिस बेस्ट पोज” हा किताब तिने पटकावला होता. विठू माऊली मालिकेनंतर आता झी वाहिनीच्या पाहिले न मी तुला मालिकेत ती समरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. समर प्रमाणे तिचे हे पात्र देखील विरोधी भूमिका दर्शवणार का? याबाबत उत्सुकता निर्माण होत आहे. येत्या काही दिवसातच तिच्या भूमिकेबाबत स्पष्ट होईलच या भूमिकेसाठी तेजश्री मुळे हिला खूप खूप शुभेच्छा…