पाहिले न मी तुला या मालिकेची टीम सध्या गोव्यामध्ये दाखल झाली आहे काही दिवस इथेच राहून या मालिकेने आपले शूटिंग सुरू केले आहे. मालिकेत मेघाच्या नवऱ्याची म्हणजेच सत्यजितची एन्ट्री झाली आहे. इतके दिवस केवळ मेघाशी फोनवरून बोलत असलेला सत्यजित अखेर मालिकेतून एन्ट्री घेणार आहे. हा सत्यजित दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील श्रेयस म्हणजेच अभिनेता “सचिन देशपांडे” आहे. सत्यजित हा या मालिकेत मेघाचा नवरा असून दोघांचे पटत नसल्या कारणाने हे दोघे वेगळे राहण्याचा निर्णय घेतात.

मात्र सत्यजित वारंवार फोनवरून आपल्या चुकीची कबुली देऊन मेघाशी बोलण्याचा आणि तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज अखेर हा सत्यजित प्रेक्षकांसमोर आला असून या पात्रामुळे मालिकेला कसे वेगळे वळण लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. कारण मेघाची बहीण आणि मालिकेची प्रमुख नायिका असलेली मानसी ही नेहमीच सत्यजितची बाजू जाणून घेण्यास उत्सुक असते शिवाय आपल्या बहिणीच्या मोडलेल्या संसाराची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करत असते. यात आता मानसीच्या ठरलेल्या लग्नाला सत्यजित विरोध करेल का किंवा तो मानसीला संकटातून बाहेर काढेल का आणि तिला साथ देईल का हेही पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे. होणार सून मी ह्या घरची , माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतूनही सचिनने कायम संयमी भूमिका साकारल्या आहेत सत्यजितची ही भूमिका देखील तशीच असेल का किंवा तो विरोधी भूमिका दर्शवेल का हे येत्या काळात अधिक स्पष्ट होईल तुर्तास पाहिले न मी तुला मालिकेतील सत्यजितच्या भूमिकेसाठी सचिन देशपांडे ह्याला खूप खूप शुभेच्छा…