देवमाणूस मालिकेत डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंगने मायराला कीडनॅप केले होते कालच्या भागात त्याने मायराला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले आहे. दिव्याने देवीसिंगची केस सोडावी म्हणून डॉक्टरकडूनच हा घाट घातला गेला होता यात डिंपलची साथ त्याला मिळत गेली. मालिकेत अजितकुमार खराखुरा डॉक्टर नसला तरी या मालिकेतील एक कलाकार खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहे हे बहुतेकांच्या परिचयाचे नसावे. आज मालिकेतील या खऱ्याखुऱ्या डॉक्टरबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

मालिकेतील खऱ्या आयुष्यातील या डॉक्टरचे नाव आहे “डॉ शशिकांत डोईफोडे”. डॉ शशिकांत डोईफोडे यांनी देवमाणूस मालिकेत सरू आजीच्या जावयाची म्हणजेच “लालामामांची” भूमिका साकारली आहे. लालामामा हे कॅरॅक्टर देवमाणूस मालिकेतून हॉकीफुलकी कॉमेडी करण्यात यशस्वी ठरले आहे. डॉ शशिकांत हे खऱ्या आयुष्यात डॉक्टर असले तरी ते उत्तम अभिनेते आणि एक उत्तम दिग्दर्शकही आहेत. साताऱ्यातील पळशी येथील हांगे वस्ती हे त्यांचे मूळ निवासस्थान कोल्हापूर येथील मेडिकल कॉलेज मधून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. सुरुवातीपासूनच कलाक्षेत्राची ओढ असलेल्या शशिकांत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला. २००९ ते २०१७ या काळात त्यांनी सलग सहा चित्रपट बनवले आणि ते रिलीजही केले. “आमदार माझ्या खिशात” हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. “नवरा पंच बायको सरपंच”, “कसं काय मामा बरं हाय का”, “टेंडल्या निघाला ऑस्करला”, “बालाजी सांभाळ माझ्या बाळाला” अशा सामाजिक, राजकीय विषयाला हात घालून त्यांनी हे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. सयाजी शिंदे, मोहन जोशी, सतीश तारे, सुरेखा कुडची अशा नामवंत कलाकारांना घेऊन त्यांनी हे चित्रपट बनवले. “ग्रेट माय इंडिया” हा पहिला 3D मराठी बालचित्रपट तसेच “व्हायरल” हा हिंदी चित्रपटदेखील त्यांनी बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झी मराठीवरील “मिसेस मुख्यमंत्री” या मालिकेतून त्यांनी वकिलाची छोटीशी भूमिका साकारली होती शिवाय स्वतः दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत त्यामुळे दिग्दर्शनासोबतच अभिनयाची चांगली जाण त्यांना अगोदरच होती. देवमाणूस मालिकेतून त्यांच्या अभिनयाला तर चांगलाच वाव मिळत गेला. मालिकेतून सरू आजीसोबतचे लालामामाचे वाद आणि त्यातून निर्माण हेणारे विनोद प्रेक्षकांनाही हसवून गेले. डॉ शशिकांत डोईफोडे यांना त्यांच्या आयुष्याच्या या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…