भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हे सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश देखील हाच आहे की भौगोलिक परिस्थितीला जाणून आपले शरीर स्वास्थ्य त्यावर टिकवून ठेवणे. मग हा आनंदाचा सोहळा नटून थटून साजरा केलाच तर त्यात गैर काय?…कारण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सणसमारंभ आले की झोपडीतल्या गरिबांची जाणीव करून दिली जाते, अवास्तव खर्च करू नका, देखावा करू नका, गरिबांना दान करा असाच उपदेश देण्यात येतो. यावर कविता किंवा लेख लिहून त्याची सर्वदूर प्रसिद्धी केली जाते.

अगदी नवरात्रीच्या दिवसात नऊ रंगाच्या साड्या नेसणे अनेकांना खुपु लागले आहे. एवढेच नाही तर इतर सणांच्या बाबतीत देखील असेच उपदेश देण्यात येतात. मान्य आहे नऊ दिवस नऊ रंगाची साडी नेसणे हे काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धिस आलं आहे पण त्यामागे कुणाचाच वाईट हेतू मात्र कधीच नव्हता. मग आम्ही महिलांनी हे सण समारंभ साजरे करायचेच नाहीत का?…मुळात कोणीही जन्मतः आपल्या तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेला नसतो ना की तो गर्भश्रीमंत असतो. आपला संसार ,मुलं बाळं सांभाळून या महिला कामाला जातात, पैसे कमावतात मग त्यातून एक विरंगुळा म्हणून, स्वतःला वेळ देता यावा म्हणून नवरात्रीच्या दिवसात नऊ रंगाच्या साड्या नेसतात. जर नवऱ्याच्या किंवा स्वतः कमावलेल्या पैशातून त्या उपभोग घेत असतील तर त्यात त्यांचं कुठे चुकलं?…आर्थिक परिस्थिती बळकट नसल्याने त्याही कधीकाळी मारुनमुटकून जीवन जगलेल्या असतात. आपल्याच पैशाचा उपभोग आपणच नाही घ्यायचा तर त्या पैशाला काही किंमत राहील का?…

राहिला प्रश्न गरिबांना दान करण्याचा तर कामावर जाता येता बहुतेकवेळा गरीब लोकांचे दर्शन घडते त्यावेळी आपोआप हात पर्सकडे जातोच यातून त्यांच्या हातात काहीतरी दिल्याचे समाधान नेहमीच मिळते… घरकाम करणाऱ्या महिला असो त्यांना पगारा खेरीज सणाला साडी आवर्जून घेतो. दिवाळीचा फराळ असो किंवा आर्थिक मदत म्हणून असो अशा स्वरूपाची ही मदत त्यांना त्या जेथे जेथे काम करतात तिथून केलीच जाते. मंदिरात गेलो तरीही तिथे दानपेटीत काहीतरी टाकल्याशिवाय दानधर्म केल्यासारखे वाटत नाही. मग असे असूनही आमच्या सण साजरे करण्यावर नेहमी आडकाठी का आणली जाते. अशाच वेळी नेमकी झोपडीतल्या गरिबांची आठवण का होते?…सण समारंभ तितक्याच उत्साहाने आणि आपुलकीने साजरे करा तरच पुढच्या पिढीला या संस्कृतीची , सणांची जाणीव राहील…