चला हवा येऊ द्या या मंचावरून आजवर अनेक कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. चला हवा येऊ द्या चाच एक महत्वाचा भाग असणारा कलाकार गेल्या काही दिवसांपासून मंचावर दिसत नाही त्यामुळे त्याने हा शो सोडला की काय? हे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. हा कलाकार आहे “कृष्णा घोंगे”. कृष्णा घोंगे चला हवा येऊ द्या च्या थुकरटवाडीचा महत्वाचा भाग बनला आहे . गेल्या अनेक वर्षांपासून तो या मंचावरून कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे यांना साथ देत आहे. त्याचा या मंचावर प्रवेश झाला तो ओघानेच कारण छोटी मोठी कामं करणारा कृष्णा थुकरटवाडीचा महत्वाचा घटक बनला हा त्याचा प्रवास खरोखर प्रेरणादायी म्हणावा लागेल.

कृष्णा घोंगे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावचा. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजुरी करायचे यासोबतच ते छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे अशी मिळेल ती छोटी मोठी कामं करत असे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असायची. या परिस्थितून कृष्णा घोंगे यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केले. पहिलीत असल्यापासूनच कृष्णा घोंगे शाळेत भाषण करायचे पुढे ४ थीत असताना नाटकातून गवळ्याची रंभा ही स्त्रीव्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना मावशीकडे राहावे लागले. राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात १२ वि पर्यंतचे शिक्षण केले. पुढे सिएनसीमध्ये डीप्लोमाचे प्रशिक्षण घेतल्यावर चाकण येथील कंपनीत नोकरी केली. परंतु इथेही फारसा जम न बसल्याने त्यांच्या बहिणीने त्यांना मुंबईला बोलावले. मोटार ड्रायव्हिंग स्कुलमध्ये कार शिकवण्याचे काम केले. शोरूममध्ये सेल्समनची नोकरी केली. नोकरी करत असताना एक आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवले. मराठी सृष्टीत काम मिळतं का म्हणून दिग्दर्शकाकडे विचारपूस केली मात्र बोलण्यात ग्रामीण भाषेचा बाज असल्याने त्याला स्पष्ट नकार मिळत गेला.

शेवटी एक प्रयत्न म्हणून हिंदी सृष्टीत नशीब अजमावले तर तिथे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून साथ निभाना साथीया, पवित्र रिश्ता, ये रिश्ता क्या केहलाता है सारख्या गाजलेल्या मालिका केल्या. अनेक शॉर्टफिल्म त्याने बनवल्या. त्यानंतर डॉ निलेश साबळे सोबत ओळख झाली. निलेशने कृष्णाला चला हवा येऊ द्या मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिले. सहाय्यक दिग्दर्शकाची ही भूमिका बजावत असताना कधी कधी अभिनयाची संधी देखील मिळत गेली. हिंदी चित्रपट, शॉर्टफिल्ममधून आजही अभिनयाची संधी मिळत आहे. याच कारणामुळे कृष्णा घोंगे सध्या चला हवा यर द्या च्या मंचावर दिसत नाहीत. प्रतीक गांधी सोबत ‘रिस्क है तो ईश्क है’ असं म्हणत त्याने एक फोटो शेअर केला आहे. कृष्णा आता हिंदी मधील झी कॉमेडी शो चा भाग बनला आहे, यामुळेच तो सध्या तरी चला हवा येऊ द्याच्या मंचावर पाहायला मिळत नाही. चला हवा येऊ द्या शो मध्ये त्याला भरभरून यश मिळालं म्हणूनच त्याला आता झी च्या हिंदी कॉमेडी शो मध्ये जाण्याची संधी मिळाली. यासाठी कृष्णा घोंगे यांचे खूप खूप अभिनंदन आणि अभिनयाच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा….