आषाढी एकादशीचा दिवस संपला तरी अजूनही विठूभक्तीचं वातावरण भरून पावलं आहे. लाखो भाविक पायी दिंडीने माउलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले. चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला आहे. पिढ्यानपिढ्या वारीला जाणाऱ्या या सारस्वतांचा उत्साह कौतुकाचाच आहे. वारीतील अनुभव ऐकणं हादेखील एक वेगळा सोहळा असतो. गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होउन वारकऱ्यांशी संवाद साधत कलाकार मंडळीही विठठलनामात तल्लीन होत असल्याचे दिसून येते. सोशलमीडियावर कलाकार त्यांचे अनुभव शेअर करत असतात. यंदाच्या पंढरीच्या वारीच्या निमित्ताने मराठी सिनेमाजगतातील अभिनेता दिग्दर्शक असलेल्या अवलियानेही पंढरी गाठली. या पठठ्याने आईवडीलांना विठूमाउलीच्या दर्शनाला आणले. आईवडीलांची ही इच्छा पूर्ण केली आहे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी. सध्या प्रवीण यांचा हा अनुभव फोटोसह सोशलमीडियावर चर्चेचे रेकॉर्ड मोडत आहे.

डायलॉग, अभिनय, दिग्दर्शन यासोबतच जे मनात येईल ते बिनधास्तपणे करण्यासाठी प्रसिध्द असलेला कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण जितका त्याच्या सिनेमाविषयी गंभीर असतो तितकाच तो त्याच्या कुटुंबासाठी काय वाटटेल ते करण्यासाठी तयार असतो. प्रवीणने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आपली माणसं जपली पाहिजेत असा संदेश दिला होता. घरातील माणसं आनंदी ठेवली की आपोआप आपले आयुष्य आनंदी होते हा प्रवीणचा मंत्र आहे. आपल्या माणसांचा आनंदी चेहरा पाहून जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा तुमचा दिवस छान जातो, तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो असं म्हणत प्रवीणने त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली होती. आता पुन्हा एकदा प्रवीणने त्याच्या आईवडीलांसाठी एक अशी गोष्ट केली आहे की त्यामुळे चाहते प्रवीणचं कौतुक करताना थकले नाहीत तरच नवल. प्रवीणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आईवडीलांसाठी असं काहीतरी करावं जयामुळे त्यांना आनंद होईल याचा प्रवीण विचारच करत होता. काही दिवसांपूर्वी प्रवीणने त्याच्या आईवडीलांना विचारलं की त्यांना कुठे फिरायला जायला आवडेल. तुम्ही म्हणाल त्या देशात मी घेउन जाईन. आईवडील आता कोणत्या देशाचं नाव घेतात याकडे कान लावून बसलेल्या प्रवीणला त्याच्या जन्मदात्यांनी सुखद धक्का दिला. ते म्हणाले की आम्हाला पंढरपूरला जायचे आहे. खरंतर प्रवीणचे आईवडील गेली ५0 वर्षे वारीतून पंढरीला जातात, पण पंढरपुरात पोहोचल्यानंतर धक्काबुक्कीतच विठूरायाच्या गाभाऱ्यात जावं लागतं. गर्दीमुळे मनभर त्याला पाहताही येत नाही अशी खंतही प्रवीणच्या आईवडीलांनी बोलून दाखवली. मग काय विचारता, प्रवीणने आईवडीलांची इच्छापूर्ण करण्यासाठी कंबरच कसली.

हातातली सगळी शूटिंग थांबवली आणि आईबाबांना पंढरपुरात घेउन जाण्याची तयारी केली. ऐन एकादशीदिवशी प्रवीणने आईवडीलांना विठठलाच्या मूर्तीसमोर उभं केलं. विठूरायाच्या मूर्तीकडे पाहून प्रवीणच्या आईवडीलांना रडू आवरलं नाही. माझ्या मायबापाच्या डोळ्यात त्यांच्या विठूमाउलीला भेटल्याचा आनंद पाहूनच माझी वारी पूर्ण झाली असंही प्रवीणने या पोस्टमध्ये लिहिलंय. प्रवीणने विठठलमंदिराच्या गाभाऱ्यातील आईवडीलांसोबतचा फोटो शेअर करत हा क्षण अनुभवला आहे. विठठलाला निरखून पाहणारे आईबाबा आणि त्यांच्या डोळयातील आनंदातच आनंद मानणारा प्रवीण तरडे असा हा फोटो एकादशीच्या निमित्ताने खूपच बोलका ठरला आहे. आयुष्यातील प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या पत्नीला प्रत्येक वाढदिवशी सात फ्लॅट भेट देणाऱ्या प्रवीणवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहेच. आपल्या कुटुंबासोबतचे अनुभव शेअर करणाऱ्या प्रवीणच्या या पोस्टवरही चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.