अभिनेता कुशल बद्रिके आणि विजू माने हे ८ ऑक्टोबरला ठाण्यात एकत्र फिरत असताना उन्हाचे चटके लागताहेत हे पाहून थंड काहीतरी घेण्यासाठी ठाण्याच्या पंचपाखाडी परिसरातील उत्सव रेस्टोरेंटला गेले. आधी ते बिअर घेणार होते पण बिअर नको काहीतरी थंडच घेऊ म्हणून त्यांनी जवळच असलेलं उत्सव रेस्टोरेंट गाठलं. तिथे त्यांनी फ्रेश लाईम सोडा आणि फ्रेश लाईम वॉटर ऑर्डर केलं. जेंव्हा त्यांनी वेटरला बिल आणायला सांगितलं तेव्हा त्यांना घामच फुटला. ह्यावर त्यांनी लगेच सोशिअल मीडियावर फोटो अपलोड करत बिलासह एक पोस्ट लिहली.

विजू माने यांनी आपल्या सोशिअल मीडियावर ते बिल सह एक लिहलेला अनुभव शेअर केला आहे ते म्हणतात “मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बीयर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. ( हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे).” फ्रेश लाईम सोडा आणि फ्रेश लाईम वॉटर ह्या दोन्ही पेयांच मिळून टॅक्स सह त्यांना ३२५ रुपये इतकं बिल आलं. लिंबू पाणी पेक्षा बिअर स्वस्त असं त्यांचं म्हणणं असलं तरी ते लिंबू पाणी जर तुम्ही महागड्या हॉटेलात घेतलं तर ते तुम्हाला महागच पडणार असं अनेकांनी कमेंट करत सुनावलं. तर काहींनी त्यांची मज्जा घेत आधी आम्हाला हे सांगा कि ह्यातलं फ्रेश लाईम सोडा कोण प्यायलं आणि कोण फ्रेश लाईम वॉटर प्यायलं. तर काहींनी “हे म्हणजे कसं झालं पाण्यात बसलेली म्हैस आहे की रेडा हे बघितल्याशिवाय सौदा करु नये, तसेच इथे किंमत विचारल्याशिवाय कोणतेही पेय घेऊ नये.” असं देखील म्हटलं.