मराठमोळी अभिनेत्री “सुप्रिया कर्णिक” हिने हिंदी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा चांगलाच उमटवला आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या बायोपिकमध्ये सुप्रिया कर्णिकने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती त्यावेळी तिच्या लुकने सर्यांचेच लक्ष वेधले होते. वेलकम, ढाई अक्षर प्रेम के, तलाश , यादें, राजा हिंदुस्थानी, मुझसे शादी करोगी या आणि अशा कित्येक बॉलिवूड चित्रपटातून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. शांती, वो रेहनेवाली मेहलोंकी, कानून, तेहकीकात यासारख्या मालिकेतूनही अभिनयाची छाप पाडली. कानून ही तिने अभिनित केलेली पहिली वहिली हिंदी मालिका. मॉडर्न आणि खऱ्या आयुष्यात तितकीच डॅशिंग असलेली सुप्रिया अभिनय क्षेत्रात कशी आली आणि तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात….

सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाची मोठी झाली तिच्या दोन्ही बहिणी तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असल्याने आई सोबतच तिचे जास्त पटायचे. दोघी बहिणी मोठ्या असल्या तरी कुणी त्यांची छेड काढली तर ही सुप्रिया त्यांच्या मदतीला धावून जायची त्यामुळे सुरुवातीपासूनच सुप्रिया टॉम बॉय म्हणून ओळखली जायची. आई वडील देघेही सुशिक्षित त्यामुळे दहावी झाल्यानंतर तिघी मुलींनी नोकरी करून शिक्षण घेतले. दोघी बहीण एअरलाईन क्षेत्रात नोकरी करत होत्या. दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या अडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये असताना पेपरमध्ये एअरहोस्टेसची ऍड वाचली. सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले . पुढे मित्रांच्या मदतीने मुंबईत येऊन एक ओडिशन दिली. तीन महिन्यांनी रवी चोप्रा आणि गुफी पेंटल यांनी “कानून” या हिंदी मालिकेत पहिल्यांदा अभिनयाची संधी दिली. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यास घरच्यांचा स्पष्ट नकार होता. तरीही या क्षेत्रात येण्याचे धाडस सुप्रियाने दाखवले. १९९८ साली “तिसरा डोळा” या मालिकेतून सुप्रिया मराठी सृष्टीत झळकली होती. त्यावेळी सुप्रिया पंजाबी किंवा पारसी असावी असा समज प्रेक्षकांनी केला होता ज्यावेळी तिचे खरे नाव प्रेक्षकांना कळले त्यावेळी ती महाराष्ट्रीयनच असल्याचे लोकांना समजले. मराठी चित्रपटातूनही मला एक कलाकार म्हणून नाही तर परदेशी महिलेच्या भूमिका जास्त मिळू लागल्या. त्यामुळे मी हिंदी सृष्टी सोडून मराठीकडे वळण्याचा विचार बदलला असे सुप्रियाने एका मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते. मधल्या काळात अनेक विरोधी भूमिका तिच्या वाट्याला आल्या मात्र वेलकम चित्रपटाने तिच्या अभिनयाचे पैलू आणखी उघड केले.

सुप्रिया कर्णिक आजही अविवाहित आहे. याचे कारण तिने एका मुलाखतीत दिले होते. सगळ्यांनाच आपल्या आयुष्यात हक्काचा, प्रेमाचा जोडीदार हवा असतो तसा क्षण तिच्या आयुष्यात आलाही. सुप्रिया दोन वेळा प्रेमात पडली मात्र दोन्ही वेळेला तिची फसवणूकच झाली. या फसवणुकीमुळे मी त्यांना चोप देऊन लोळवलं देखील होतं असं ती म्हणते. एकदा चुकलेल्या माणसाला मी कधीच क्षमा करत नाही असे ती त्या मुलाखतीत म्हणाली होती. त्यानंतर मात्र लग्नाचा विषय देखील बाजूला होत गेला. अभिनयाचा प्रवास सुरु असताना अध्यात्मिकतेचे धडे तिने गिरवले. एवढेच नाही तर आजच्या तरुण पिढीला देखील ती अध्यात्मिकतेकडे वळवण्याचे कार्य करत आहे. मुलांना योग्य त्या प्रवाहात आणून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे कार्य ती करत आहे. त्यामुळे मॉडर्न राहूनही आध्यात्म जपणारी मराठमोळी सुप्रिया प्रेक्षकांना भावली. चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिने कधीच कोणापुढे हात पसरले नाहीत. जे काम मला योग्य वाटतं ते मी मन लावून करते त्यामुळे वाईट मार्ग निवडायचा कधी प्रश्नच आला नाही हेच धोरण ठेऊन चंदेरी दुनियेत आज ती आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकली आहे…