९० च्या दशकात ‘लपंडाव’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला पल्लवी रानडे, सुनील बर्वे, अजिंक्य देव, वर्षा उसगावकर, सविता प्रभुणे, विक्रम गोखले, अशोक सराफ, वंदना गुप्ते , बालकलाकार सई देवधर असे मातब्बर कलाकार लाभले होते. चित्रपटाला आणि अभिनेत्री पल्लवी रानडे बालकलाकार सई देवधर हिला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. सई देवधर हि मराठी हिंदी मालिका अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही ओळखली जाते.

सई देवधरचे वडील सिनेमॅटोग्राफर होते तर तिची आई श्रावणी देवधर या मराठी चित्रपट दिग्दर्शिका आहेत. लपंडाव चित्रपटात सई देवधरने सुनील बर्वेची धाकटी बहीण ‘चीनी’ची भूमिका साकारली होती. ९० च्या दशकातील प्रहार या हिंदी चित्रपटातूनही ती बालकलाकार म्हणून झळकली होती. पुढे जाऊन सारा आकाश , बात हमारी पक्की है, उडाण , द शोले गर्ल, एक लडकी अनजानी सी अशा हिंदी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सारा आकाश या हिंदी मालिकेतील तिचा सहकलाकार “शक्ती आनंद” याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. सई आणि शक्ती आनंद यांना एक मुलगी आहे. हिंदी मालिका गाजवल्यानंतर सई देवधर मराठी सृष्टीकडे पुन्हा एकदा वळली. ‘मोगरा फुलला’ या मराठी चित्रपटात तिने स्वप्नील जोशी सोबत मुख्य भूमिका साकारली होती. सायलेंट टाय, ब्लड रिलेशन, बढाई हो, संस्कारी अशा चित्रपट, शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा तिने सांभाळली होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

साटं लोटं पण सगळं खोटं, संस्कारी, आणि आता सध्या कलर्स मराठी वाहिनीची ‘सोन्याची पावलं’ मालिकेची निर्मिती तिने केली आहे. सोन्याची पावलं याच मालिकेतून सईने अभिनय देखील साकारला आहे. देवी आईची भूमिका ती या मालिकेत साकारत आहे. मालिकेत भाग्यश्रीचे पात्र जितके साधे आणि जबाबदार दाखवले आहे तितकिच संकटं तिच्यासमोर उभी आहेत. दुष्यंतसोबत लग्न झाल्यानंतर त्याची आणि कुटुंबाची जबाबदारी ती कशी पेलते याची ही कहाणी आहे. यात भाग्यश्रीला पद्मिनी आणि नेत्रा कसा छळ करतात हे दाखवले आहे मात्र देवी आई तिला या संकटातून कशी वाचवते हे या मालिकेतून रंजक होत चाललं आहे. या देवी आईची दमदार भूमिका अभिनेत्री सई देवधर हिने तिच्या अभिनयाने सुरेख साकारलेली पाहायला मिळते आहे.