कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत मल्हारचे लग्न अंतराच्या बहिणीसोबत जुळले असताना मल्हारचे अंतरा सोबत लग्न होते असे असले तरी हे दोघे आता कधी एकत्र येणार आणि आपल्या प्रेमाची कबुली देणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे. तुर्तास मल्हार अंतराला पत्नीम्हणून स्वीकारत नसला तरी आता लवकरच या मालिकेत एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. या ट्विस्टमुळे मल्हार अंतराच्या आणखी जवळ जाणार आहे.

मालिकेत मल्हारची भूमिका साकारली आहे अभिनेता सौरभ चौघुले याने आणि अंतराच्या भूमिकेत दिसत आहे अभिनेत्री योगिता चव्हाण. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील खूपच भावली आहे. त्यामुळे मालिका विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत नुकताच एक ट्विस्ट येणार आहे . मल्हार आणि अंतरा यांच्या लग्नाअगोदर त्यांचा एकत्रित असलेला एक फोटो चित्राने व्हायरल केलेला असतो. हा फोटो कोणी व्हायरल केला याची चौकशी मल्हार पोलिसांकडे करतो. दरम्यान पोलीस या घटनेचा शोध घेतात आणि सुहासिनीला फोन करून हॅकर्सचा पत्ता देतात. सुहासिनी दिलेल्या पत्त्याचा मग काढत असताना अंतरा देखील संशय आल्याने त्यांच्या मागोमाग जाते. सुहासिनी ऑफिसच्या आत गेल्यावर अंतरा देखील तिथे दाखल होते. ऑफिसमध्ये असलेल्या माणसांना चित्राचा फोन येतो आणि सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी ऑफिसला आग लावा असे सांगते. मात्र ऑफिसमध्ये असलेली सुहासिनी आगीच्या लोटात अडकते आणि मदतीसाठी हाका मारते तितक्यात जवळच असलेली अंतरा त्या आगीतून सुहासिनीला सुखरूप बाहेर काढते. दरम्यान त्या हॅकर्स बाबत मल्हारला देखील कळल्यामुळे तो त्या ऑफिसजवळ येतो आणि अंतराची सुहासिनीला वाचवण्याची धडपड प्रत्यक्षात पाहतो. त्यामुळे मल्हारचा अंतराबाबत एक हळवा कोपरा निर्माण होताना दिसत आहे. आता चित्राची कटकारस्थाने सर्वांसमोर उघड होणार की नाही? हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.