मराठी कलाकार हिंदी चित्रपटांत फारच कमी दिसतात आणि दिसले तरी ते नोकराच्या भूमिकेत पाहायला मिळतात असं अनेकांचं मत आहे. अशातच प्रिया बेर्डे यांनीही आपले मत व्यक्त करत काय म्हटले ते पहा…मी आता जे इथे व्यक्त होणार आहे त्याने खरंच काही कुणाला फरक पडणार आहे का?माहीत नाही… मी जे लिहितेय ते कुणी नीट वाचणार आहे का? माहीत नाही… माझ्या या म्हणण्यावर खूप जण आपलं मत उत्तम मांडतील किंवा खूप जण त्याला वेगळेच रंग देऊन ट्रोल करतील किंवा आता हिचं काय म्हणून तोंड वेंगाडतील.. ठीक आहे ते आता महत्वाचं नाही.
तर सध्या जे सगळ्या बाजूंनी वातावरण तापलंय ते नक्की आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सतत सगळे एकमेकांना शाब्दिक थोबडवत असतात, सतत आम्ही किती हुशार तुम्ही किती मूर्ख, तुम्ही कसे चुकलात आम्ही किती बरोबर, तू माझी गाय मारलीस थांब आता मी तुझं वासरू मारतो… बरं हे सगळं चालू असताना मीडियाची जी काही धाव पळ, धक्का बुक्की, ढकलाढकली चालू असते ते वेगळंच, यात आमच्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या काही लोकांनी आपलं मत व्यक्त केलं, विरोध दर्शवला की आता त्यांच्या मागे लागलेत यांना कोण विचारतो , हिंदी मध्ये नोकराची, मित्राची कामं करणारे नटनट्या, नवीन स्कुटर चे फोटो टाकणारे, किंवा इथे अत्याचार झाले तेव्हा कुठे होते, तिथे अन्याय झाला तेव्हा कुठे होते असं बरंच काही तोंडसुख घेतात, हो रे बाबानो तुमच खरं आहे आम्ही खूप सामान्य कलाकार आहोत तुम्हा प्रेक्षकांना मायबाप मानणारे आम्ही कलाकार आहोत आणि हे मराठी कलाकारांवर पूर्वापार झालेले संस्कार आहेत, हो आम्ही केलीत नोकराची आणि मित्रांची कामं हिंदीत, पण आमच्या समोर भल्याभल्या हिंदी हिरोची अभिनय करताना हातभर फाटलीय, नोकर न मित्रानं सारख्या नगण्य भूमिका आपल्या मराठी नटांनि सरस करून ठेवल्यात, हो आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो टाकतो कारण ते आपल्या कष्टातुन आलेल्या पैशातून असतात, मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक कलाकार श्रीमंत असतो?

तुम्हाला दिसताना खूप ग्लॅमर दिसत पण इथेही खूप कष्ट आहेत, त्यात इथे नशिबाचा भाग पण खूप जास्त आहे, खूप असुरक्षित वातावरण असत इथे, बॉलिवूड सारखं आमचं बजेट नसतं कारण आमच्या पिक्चर ना थिएटर मिळत नाहीत, ज्यांच्या कडे काम आहे त्यांच्याकडे आहे , काहीजण कित्येक महिने घरात बसून काढतायत खूप वाईट स्थिती आहे आर्थिक व मानसिक दृष्ट्या फार कठीण काळ आहे, अश्या वेळी आपलेच मायबाप प्रेक्षक अत्यंत घाणेरड्या पध्दतीने जर बोलायला लागले तर काय करायचं? कुणी येणार आहे का आमची घरं चालवायला? काही कलाकार व्यक्त होताना थोडे ओव्हररिऍक्ट होत असतीलही पण म्हणून कुणालाही आयमाय च्या भाषेत बोलायचं कारण नसतं, गेल्या 6 महिन्यात तुम्ही टीव्ही वर आमचेच चित्रपट, सिरियल्स बघून स्वतःचे मनोरंजन करत होतात हे विसरू नका, आमचं क्षेत्र नसतं तर विचार करा या कठीण काळात काय केलं असत तुम्ही? आम्ही तुम्हाला मायबाप समजतो तर तशी जाणीव तुम्ही पण ठेवावी ही नम्र विनंती…