९० च्या दशकातील “घनचक्कर” हा चित्रपट अशोक सराफ यांच्या अफलातून भूमिकेने खूपच गाजला होता. त्यातील’ दत्तू मेला नी आम्हा दोघांचं नशीब उघडून गेला…’ गाण्यात अशोक सराफ यांच्यासोबत माधवी गोगटे ही अभिनेत्री झळकली होती. प्रमुख नायिका म्हणून वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून अशोक सराफ यांच्यासोबत अनेक अभिनेत्री झळकल्या त्यातील माधवी गोगटे या एक म्हणाव्या लागतील. मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून माधवी गोगटे प्रामुख्याने पाहायला मिळाल्या असल्या तरी मराठी सृष्टीपेक्षा त्यांना हिंदी मालिका सृष्टीत पुरेसा वाव मिळाला असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात…

घनचक्कर चित्रपटात माधवी गोगटे यांनी अशोक सराफ यांची नायिका म्हणून प्रमुख भूमिका बजावली होती. गेला माधव कुणीकडे हे प्रशांत दामले सोबत साकारलेलं त्यांचं नाटक तुफान गाजलेलं पाहायला मिळालं. परंतु मराठी सृष्टीपेक्षा त्यांनी हिंदी मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली. मिसेस तेंडुलकर, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा, बाबा ऐसो वर ढुंडो, ढुंड लेंगी मंजिल हमें, कहीं तो होगा अशा एकामागून एक हिंदी मालिकांमधून त्यांच्या अभिनयाला भरपूर वाव मिळत गेला. साधारण २०१० साली “ढूंढ लेगी मंजिल हमें” या मालिकेत काम करत असताना प्रवासादरम्यान त्यांच्या कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला या अपघातात त्यांना मोठी दुखापत झाली होती त्यामुळे ती मालिका अर्ध्यावरच त्यांना सोडावी लागली होती. उपचारानंतर पुन्हा त्याच मालिकेत त्यांनी पुनःपदर्पण देखील केले होते. गेल्या वर्षीच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून काम नसल्याचे सांगत ‘कामाची अतिशय जरुरी आहे ‘ अशी एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टला मराठी कलाकारांनी दखल घेत मदतीचे आश्वासन दिले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून प्रथमच त्या मराठी मालिकेत झळकताना दिसल्या. झी युवा वाहिनीवर सुरू असलेल्या “तुझं माझं जमतंय” ही त्यांनी अभिनित केलेली पहिली मराठी मालिका या मालिकेत त्यांनी श्रीमती नगरकरची भूमिका साकारली आहे. मालिकेतील पम्मी अर्थात अपूर्वा नेमळेकर सोबतची त्यांची नोकझोक या मालिकेतून पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीत पुनःपदार्पण केलेल्या माधवी गोगटे यांना आणखी अशाच काही मालिकेतून काम मिळत राहो हीच सदिच्छा….