कुशल बद्रिके हे नाव घेतलं की त्याचे विनोदी पंच आठवून हसू फुटतं. चला हवा येऊ द्या या शोमधील कुशलचा अंदाज पाहता कुशल म्हणजे हसवणूक हे समीकरणच झालंय. पण कुशलला जितकी विनोदाची नस माहिती आहे तितकाच तो एक संवेदनशील माणूसही आहे. समाजातील अनेक गोष्टींवरचं कुशलचं भाष्य त्याच्या चाहत्यांनाही अवाक् करत असतं. सोशलमीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कुशलच्या फोटो, व्हिडिओ किंवा रिल्सच्या माध्यमातून तो काही ना काही गंभीर गोष्टीही मांडत असतो. अर्थातच कुशलच्या आजपर्यंतच्या अशा अनेक पोस्ट खूपच चर्चेत आल्या आहेत. आताही त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये तो संवादही साधताना दिसतोय.

आयुष्यातील एकटेपणावर कुशलने शेअर केलेली पोस्ट सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमुळे कुशल घराघरात पोहोचलाय. कुशलने या शोमध्ये केलेल्या अनेक भूमिकांनी कुशलच्या अभिनयातील वैविध्य चाहत्यांनी पाहिलं आहे. याशिवाय स्ट्रगलर या वेबसीरीजमध्येही कुशलने विनोदातून चिमटे काढले आहेत. पांडू या सिनेमातील कुशलचा अभिनयही भाव खाऊन गेला. कुशल मोठ्या, छोट्या पडद्यावर तर अभिनयाचे चौकार मारत असतोच पण प्रत्येकाच्या हातातील मुठीत असलेल्या स्मार्ट फोनमधील सोशलमीडियाच्या जगातही तो काहीतरी हटके घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असतो. कुशलने नुकताच जो व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात तो एका हॉटेलच्या रूममध्ये दिसत आहे. चहाचे घोट घेताना, रूममधील खिडक्यांच्या पडद्यांशी चाळा करताना त्याचे काही क्षण व्हिडिओत कैद झालेत. पण व्हिडिओमध्ये काय आहे ते ऐकून क्षणभर नेटकरी आणि कुशलचे चाहतेही त्यांच्या आयुष्याच्या विचारात पडल्याशिवाय राहत नाहीत. समोर रूममध्ये फिरत असलेला कुशल आणि मागे त्याचा आवाज असा हा व्हिडिओ नेटकरी पुन्हा पुन्हा पाहत आणि ऐकत आहेत.

या व्हिडिओमध्ये कुशल असं म्हणतोय, कधी कधी खूप एकटं एकटं वाटत. म्हणजे माणसं असतात आपल्या आजूबाजूला पण आतून एकाकी असतो. खरंतर आपण सारेच एकटे असतो. आणि प्रयत्नपूर्वक आपण आपला एकटेपणा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यालाच माहिती असतं की या दुनियेच्या जत्रेत आपला हात सुटलाय कुणाच्यातरी हातून तो हात पुन्हा आपल्या हाती लागेल याची पुसटशी आशासुध्दा नाही. अशा असंख्य सुटलेल्या हातांचीच ही जत्रा आहे. आपण या एकटेपणामुळे हरवतो या जत्रेत. पण या आयुष्याच्या जत्रेत स्वताला हरवायलाही आलं पाहिजे आणि सापडायलाही आलं पाहिजे. कुशलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तर कमेंट केल्या आहेतच पण अनेक सेलिब्रिटी कलाकारांनीही कुशलच्या या आयुष्यातील तत्वज्ञान सांगण्याच्या कौशल्याला दाद दिली आहे. गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी कुशलसाठी खास कमेंटही केली आहे.