२००६ साली गाढवाचं लग्न हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनयाने साकारलेला सावळया प्रेक्षकांना पुरता हसवून गेला त्यात सावळ्यासोबत गंगीची जुळून आलेली केमिस्ट्री आणखीनच धमाल करून गेली. पुरुष व्यक्तिरेखेच्या तोडीसतोड धडाकेबाज गंगी प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास यशस्वी ठरली. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १४ वर्षे उलटली मात्र चित्रपटातली गंगी मधल्या काळात कुठे गायब झाली हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतो. चला तर मग जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल अधिक….

गाढवाचं लग्न चित्रपटात गंगीची भूमिका साकारली होती “राजश्री लांडगे” या अभिनेत्रीने. धडाकेबाज आणि तितकीच दिलखुलास गंगी तिने आपल्या अभिनयातून चोख बजावली होती. राजश्री लांडगे ही अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. नगर जिल्ह्यात जन्मलेल्या राजश्रीला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. कॉलेजमध्ये असताना नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. २००० सालच्या ‘सत्ताधीश’ या चित्रपटात पहिल्यांदा राजश्रीला अभिनयाची संधी मिळाली होती. कुलदीप पवार, ऐश्वर्या नारकर, रवी पटवर्धन यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटानंतर राजश्रीला गाढवाचं लग्न चित्रपटातून गंगी साकारण्याची संधी मिळाली. तिने साकारलेली ही गंगी त्यावेळी तुफान हिट ठरली होती. कुंडमाऊली मळगंगा (२००९)या चित्रपटातही ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राजश्री पुन्हा एकदा २०१५ सालच्या सिटीझन या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटात ती ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळाली होती.

या चित्रपटाची निर्मिती आणि वेशभूषेची जबाबदारी स्वतः राजश्रीने सांभाळली होती. मधल्या काळात सामाजिक बांधिलकी जपत तिने जलयुक्त शिवार योजनेसाठी १ लाखाचा धनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला होता. याशिवाय अनाथालयाला मदत करणे, मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणे, मंत्र्यांच्या प्रचाराला जाणे ह्या गोष्टींमुळे ती कायम मिडियाद्वारे प्रेक्षकांसमोर येत राहिली. चित्रपटातली तीने साकारलेली गंगी आणि इतक्या वर्षानंतर पाहिली गेलेली गंगी यात खूप मोठा बदल झाला आहे. ट्रान्सफॉर्मेशन झालेली आताची ग्लॅमरस गंगी आणखीनच सुंदर दिसते हे तिच्या आताच्या फोटोवरूनच समजते. सामाजिक कार्य करणारी आणि अभिनयात आपला ठसा उमठवणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री “राजश्री लांडगे हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा …