रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सध्या आपल्या वेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच या दोघांनी कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच एकत्र अंबाबाईचे दर्शन घेतले हे तो आवर्जून म्हणतो. गेल्या महिन्या भरापासून हे दोघेही ठिकठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखील या दोघांनी एकत्र दर्शन घेतले होते. तर चला हवा येऊ द्या, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे अशा मालिकांमधून ते छोट्याशा भूमिकेत दिसले. त्यामुळे वेड चित्रपटाची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनानंतर रितेश देशमुख सोबत आलेल्या मीडिया ऑर्गनायझरने तेथील स्थानीक पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिली होती.

हॉटेलमधून या ऑर्गनायझरने पत्रकारांना हाकलून लावले होते. ही बाब पत्रकारांनी रितेशसमोर उघड केली. दुपारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली त्याठिकाणी या पत्रकारांनी रितेशजवळ तक्रार केली. ‘आम्ही तुमची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलमध्ये आलो होतो, आम्हाला यासाठी आमंत्रण नव्हते हे आम्हाला मान्य आहे पण तुमच्या बाऊन्सरने आम्हाला हॉटेलमधून अक्षरशः ढकलून बाहेर काढले होते.’ पत्रकारांच्या या तक्रारीनंतर रीतेशने या सर्वांची माफी मागितली. ‘तुमच्यासोबत इथे काय घडलं याची मला खरंच कल्पना नव्हती. मी इथे महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो होतो, इथे आल्यावर कोणाला भेटायचं याची मला पूर्वकल्पना नव्हती, मीडिया ऑर्गनायझरच्या नुसार इथले प्लॅन ठरलेले असतात त्यामुळे याबद्दल मला फारशी माहिती नव्हती. तुमचा याठिकाणी अवमान करण्यात आला , यामुळे तुमच्या भावना दुखावल्या दुखावल्या आहेत त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतो. माझ्या लग्नाला ११ वर्षे झाली. आम्ही दोघे पहिल्यांदाच असे एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहोत. याअगोदर कधी एकत्र येण्याचा योग जुळून आला नव्हता. काही लोकांशी समक्ष भेट झाली नाही याबद्दल मी माफी मागतो. या घटनेमुळे कोणाचा अवमान झाला असेल त्याची देखील मी मनापासून माफी मागतो.

तुमच्या सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा अशी मी प्रार्थना करतो’. रितेश सोबत पत्नी जेनेलिया देखील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आली होती. चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग्य कोल्हापूरकरांना आला होता. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात अलोट गर्दी जमली होती. येत्या ३० डिसेंबर रोजी रितेश आणि जेनेलियाची प्रमुख भूमिका असलेला वेड चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, बालकलाकार खुशी हजारे, शुभंकर तावडे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. श्रावणीच्या एकतर्फी प्रेमाची गोष्ट वेड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जेनेलियाचा हा अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपटात तर रितेशचा दिग्दर्शित केलेला हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे त्यामुळे या दोघांसाठीही हा चित्रपट तेवढाच महत्वाचा आहे.