मागील काही दिवसांपासून अश्लील चित्रफीत निर्मिती प्रकरणामुळे राज कुंद्रा अटकेत आहेत. या प्रकरणी अनेक अभिनेत्रींची नावे देखील उघड होताना दिसत आहेत. तर शिल्पा शेट्टी ची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीचे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ही चौकशी होते न होते तोच आता शिल्पा शेट्टीच्या आईने आपली फसवणूक झाली असल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात… शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी सुधाकर घारे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती.

त्या जमिनीची किंमत १ कोटी ६० लाखांची असल्याचे सुनंदा शेट्टी यांचे म्हणणे आहे. ही जमीन माझ्याच मालकीची आहे असे सुधाकर घारे यांनी जमीन खरेदी करतेवेळी शिल्पा शेट्टीच्या आईला पटवून दिले होते. त्यासंबंधित सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब ध्यानात येताच त्यांनी सुधाकर घारे यांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी सुधाकर यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मी एका मोठ्या नेत्याच्या खूप जवळचा आहे त्यामुळे तुम्ही कोर्टात गेला तरी काही होणार नाही असा इशारा दिला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर शिल्पा शेट्टीच्या आईने सुधाकर घारे यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आपली १ कोटी ६० लाखांची फसवणूक झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधाकर घारे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली गेली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सुनंदा शेट्टी यांनी राज कुंद्रा प्रकरणात मीडियाशी बोलताना असे म्हटले की, अश्लील चित्रफित निर्मितीमध्ये राज कुंद्रा नव्हता शिल्पा शेट्टीचे नाव देखील यात उगाचच गोवण्यात आले आहे. सुनंदा शेट्टीने आपली लेक आणि जावयाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी या प्रकरणी राज कुंद्राच्या बाजूने पोलिसांना अनेक धागेदोरे सापडले आहेत. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय वळण घेणार हे येत्या काळातच अधिक स्पष्ट होईल. तुर्तास शेती खरेदी प्रकरणात सुनंदा शेट्टी यांच्या झालेल्या फसवणूकी बद्दल ही लवकरच उलगडा केला जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.