अभिनेत्री दीपाली सय्यद नेहमीच पुरग्रस्तांच्या मदतीला धावून येताना दिसली. गेल्या वेळी कोल्हापूर येथे पूर आला होता त्यावेळी या पुरामुळे अनेक कोल्हापूर करांचे अतोनात नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून त्यावेळी अनेक मदतीचे हात पुढे आले मात्र अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी १००० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली होती. पुरग्रस्तांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी ५ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी दीपाली सय्यदचे मोठे कौतुक करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी कोकण, सातारा, कोल्हापूर या ठिकाणांना पुराने झोडपून काढले. या परिस्थितीत देखील अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना १० कोटी देणार असल्याचे सांगितले आहे. दीपाली सय्यद त्यांच्या नावाने फाऊंडेशन चालवतात याच फाऊंडेशनमार्फत त्या नेहमी आपत्तीजनक परिस्थितीत लोकांच्या मदतीस धावून येतात. दोन दिवसांपूर्वीच फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी कोल्हापूर दौरा केला आता त्या सांगली, सातारा, कोकण भागातील दौरा करून पुरपरिस्थितीची पाहणी करून तिथल्या लोकांना धीर देण्याचे काम करणार आहेत. शिवाय ही भली मोठी मदतही त्या देणार आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांना दिलेली त्यांनी ही चपराक सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात राहून इथेच कमवून जर हे कलाकार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत नसतील तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रीया दरवेळी पाहायला मिळतात. मात्र हे निगरगट्ट कलाकार कधीही मदतीचा हात पुढे करतील याची शाश्वती देत येत नाही. याच पार्श्वभूमीवर दीपाली सय्यदची ही भली मोठी मदत चर्चेचा विषय ठरत आहे. दीपाली सय्यद यांच्यासह मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. ज्यांना जे काही देणे शक्य होईल ती मदत त्यांनी करून पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली देखील आहे. शिवाय आपल्या चाहत्यांना देखील त्यांनी मदतीचे आवाहन करून या बांधवांना धीर देण्याचे काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीसाठी अनेक संस्था पुढे सरसावलेल्या पाहायला मिळत आहे. योग्य व्यक्तीला योग्य ती मदत मिळाल्याचे समाधान अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आता दीपाली सय्यद या देखील ही भरीव मदत घेऊन राज्यात पूरग्रस्त ठिकाणी दौरे करणार आहे. त्यांच्या या भरीव कार्याला महाराष्ट्र जनता नेहमीच सलाम करते आणि करत राहील.