टोटल हुबलक या झी मराठीच्या मालिकेतून अभिनेत्री मोनालीसा बागलने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. लॉक’डाऊन दरम्यान टोटल हुबलक ही मालिका मोजके एपिसोड घेऊन प्रेक्षकांसमोर आली होती. तेजपाल वाघ ची मालिका म्हटल्यावर नव्या जुन्या कलाकारांची सांगड घालत त्याने साताऱ्यातील कलाकारांना वाव देऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. त्यामुळे अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता. २०१६ सालच्या ‘प्रेम संकट’ या चित्रपटात मोनालीसाला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती.

यानंतर ‘झाला बोभाटा ‘ हा चित्रपट तिने साकारला. या चित्रपटासोबतच त्यातील गाणी तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती. ड्राय दे, परफ्युम, सोबत, गस्त हे आणखी काही मराठी चित्रपट तिच्या वाट्याला आले. मधल्या काळात लेडीज स्पेशल असलेल्या चला हवा येऊ द्या च्या मंचावरून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. मोनालीसा बागल हिच्या पावलावर पाऊल टाकत तिची थोरली बहीण देखील कलाक्षेत्रात उतरताना दिसत आहे. मोनालीसाची बहीण अश्विनी बागल लवकरच “उसासून आलय मन” या गावरान रोमँटिक गाण्यात झळकणार आहे. वैभव भिलारे यांनी हे गाणं गायलं आहे. पिकल म्युजिक प्रस्तुत या गाण्याला वैभव भिलारे सह विकी सक्सेना यांनी संगीतबद्ध केलं आहे. उसासून आलय मन हे गाणं प्रेक्षकांना येत्या २७ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. अश्विनी बागल हिच्यासोबत ह्या गाण्यात रोजन भोसले झळकणार आहे. रोहन भोसले हा देखील कलाकार असून त्याने युट्युबच्या माध्यमातून प्रेम काव्य अंतर्गत प्रथम तुज पाहता, रंग, भास, साथ देशील यासारखे एपिसोड प्रेक्षकांसमोर आणले आहेत.

या व्हिडिओजच्या माध्यमातून रोहन भोसले कवितांचे सादरीकरण करतो आहे. अश्विनी बागल पहिल्यांदाच उसासून आलय मन या गाण्यातून कलाक्षेत्रात पाऊल टाकत आहे. अश्विनी आणि मोनालीसा या दोघी बहिणींच्या दिसण्यात बरेचसे साम्य आहे त्यामुळे अश्विनीला पाहिल्यावर ही मोनालीसाच असावी असा भास होतो. अश्विनी मॉडेल म्हणूनही काम करत आहे शिवाय एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही ती जबाबदारी सांभाळत आहे. ‘टोटल हुबलक’ या मालिकेची कार्यकारी निर्माता म्हणून अश्विनीने काम पाहिले होते. आता लवकरच ती मालिकांतही उतरेल अशी आशा आहे. तिच्या येऊ घातलेल्या या नव्या कोऱ्या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळेल ह्यात शंका नाही. तूर्तास मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल ह्या दोन्ही सख्या बहिणींना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा…