तेजपाल वाघ आणि श्वेता शिंदे यांच्या बहुतेक सर्वच मालिकांमधील आज्यांनी आजवर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग लागीर झालं जी मालिकेतील ‘जिजी’ असो वा देवमाणूस मालिकेतील ‘सरू आज्जी ‘ या भूमिका मुख्य कलाकारांइतक्याच त्या आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात यशस्वी ठरल्या. झी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली “मन झालं बाजींद ” ही मालिका देखील गावरान ठसक्यामुळे आता प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. रायाची भूमिका वैभव चव्हाण याने तर कृष्णाची भूमिका श्वेता खरात हिने साकारली असून कल्याणी चौधरी, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख यासारखे परिचित कलाकार या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

त्यात आता फुई आज्जी हे पात्र देखील खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे. कुटुंबात ज्येष्ठ सदस्य असलेली फुई आज्जी आपला दरारा राखून ठेवताना दिसत असली तरी राया आणि कृष्णा यांचे लग्न होण्यासाठी ती काय काय प्रयत्न करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मालिकेत फुई आज्जीचे दिलखुलास पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “कल्पना सारंग”. कल्पना सारंग या मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी भाषिक नाटकांतून काम केले आहे. काही रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. रायजिंग स्टार या रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. शिवाय १५ ते १६ व्यावसायिक जाहिरातीतूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. शॉर्टफिल्म, आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगम अशा विविध माध्यमातून आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. मन झालं बाजींद या मालिकेत त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळणार आहे त्यामुळे त्या साकारत असलेलं फुई आज्जीचे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तुर्तास या भूमिकेसाठी कल्पना सारंग यांना खूप खूप शुभेच्छा…