हृता दुर्गुळे हे नाव आता फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठया पडद्यावरही गाजलं आहे. दहा वर्षापूर्वी दुर्वा या मालिकेतून एन्ट्री केलेल्या हृताचा प्रवास थक्कं करणारा आहे. , फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकांमध्ये आदर्श मुलगी, जबाबदार सून अशा भूमिका साकारल्या आहेत. प्रतीक शाहशी लग्नं करून हृता खऱ्या आयुष्यातही लाडकी सून झाली आहे. टीव्हीस्टार, सोशलमीडियावरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेली मराठी अभिनेत्री अशी ओळख असलेल्या हृताने अनन्या आणि टाइमपास ३ या सिनेमांमधून मोठया पडद्यावरही दणक्यात नाणं वाजवलं आहे. आता हृता कन्नी या सिनेमात अजिंक्य राऊत म्हणजेच मन उडू उडू झालं मालिकेतील इंद्राजी याच्यासोबत पुन्हा जोडी जमवणार आहे.

याबरोबरच हृताला पुन्हा एकदा सून होण्याचीही संधी मिळणार आहे. सुनेच्या रूपातील हृताला पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर असून नव्या वेबसीरीजमध्ये हृता सुनबाई होणार आहे. अगं आई अहो आई’ असं या वेब सीरिजचं नाव असून हृता यात मुख्य भूमिकेत आहे. नावामधील त्या दोन आई कोण असणार ते मात्र अद्याप कळलेलं नाही. सासू-सूनेचं नातं, रोजच्या जीवनात रंगणारं नाट्य आणि लग्नानंतर ‘अहो आई’ हे नातं ‘अगं आई’ असं झालं तर? हीच गोष्ट या सीरिजमधून बघायला मिळणार असल्याचं कळतं. दिग्दर्शक वरुण नार्वेकर, लेखिका कल्याणी पंडित यांच्याबरोबर काम करण्याचा योग हृताला आला आहे. ‘दूर्वा’, फुलपाखरू आणि ‘मन उडु उडु झालं’ या दोन्ही मालिकांत सासू-सुनेचं छान नातं दाखवलं होतं. आता ‘अगं आई अहो आई’च्या निमित्ताने प्रत्येकाला आपल्याच घरातली वाटेल अशी गोष्ट वेब सीरिजमध्ये पाहायला मिळेल. हृता दुर्गुळे हिने टाइमपास ३ या सिनेमात तिची सोज्वळ इमेज बदलून एका टपोरी मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतही प्रेक्षकांनी तिला पसंत केलं. हृता खऱ्या आयुष्यातही तिच्या सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांची लाडकी सून आहे. जेव्हा हृताचा अनन्या आणि टाइमपास ३ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते तेव्हा मुग्धा यांनी सुनेचं खूप कौतुक केलं होतं.

प्रतिकशी लग्नं ठरण्यापूर्वीच हृता आणि तिच्या सासूबाई मुग्धा यांचं छान नातं आहे. लग्नानंतर अहो आईंशी मुलीचं नातं कसं तयार होतं यावर अगं आई अहो आई ही वेबसीरीज आधारीत आहे. हृताने आजपर्यंत तिच्या मालिकांमध्ये सून ही व्यक्तीरेखा खूप छान साकारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुनेच्या रूपात हृताला पाहण्याचा आनंद तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. कन्नी या सिनेमाच्या शूटिंगसाठी हृता लंडन दौऱ्यावरून काही दिवसांपूर्वीच परतली आहे. या सिनेमाचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यापूर्वी हृताने मालिका व सिनेमांसह साखर आणि मीठ या शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. तर सुमीत राघवनसोबत हृताची स्टॉबेरी शेक ही शॉर्टफिल्मही गाजली आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या माध्यमातून हृताने रंगभूमीवरही तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. हृता पहिल्यांदाच वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या वेबसीरीजमधील हृता साकारत असलेल्या सूनबाईला भेटण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.