तुम्ही कसे दिसता ते सर्वस्वी तुमच्या अनुवांशिक गुणांवर ठरत असते, तुमच्या आसपासचे वातावरण, तुमची शारीरिक परिस्थिती आणि इतर अनेक घटकांवर ह्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. आदर्श शरीराची व्याख्या समाजमाध्यमातून रूढ झालेली आहे , महिलांनी बेढब असू नये, त्या फार उंच असू नयेत किंवा शरीराने किरकोळ असून नयेत अशी विचारसरणी असणाऱ्या व्यक्ती आजही समाजात पाहायला मिळतात. खरं तर बॉडी शेमिंग ही आता गौण गोष्ट मानली जात आहे. चित्रपट आणि मालिकांमधून अशा गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो. अभिनेत्री अन्वीता फलटणकर हिने देखील अशा मालिकेतून प्रमुख भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. ये कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे अन्वीताला मोठी लोकप्रियता मिळाली.

या मालिकेत देखील तिची भूमिका अशाच धाटणीची पाहायला मिळाली होती. त्यामुळे विरोधी प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा सामना तिने याअगोदर देखील अनुभवला होता. नुकतेच अन्वीताला एका व्हिडिओमधून ट्रोल करण्यात आल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साधारण चार दिवसांपूर्वी अन्वीताने साडी नेसलेला एक क्युटसा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या साडीत ती फारच सुंदर दिसते अशा अनेक प्रतिक्रिया तिला मिळाल्या. मात्र यामध्ये एक अशी प्रतिक्रिया देखील होती जिथे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अर्थात ही प्रतिक्रिया देणारी व्यक्ती महिला असल्याने अनेकांनी तिचा खरपूस समाचार घेतला. या टीकाकाराची ‘२ साड्या लागल्या असणार’ अशी खोचक प्रतिक्रिया पाहून अभिनेत्री अक्षया नाईक हिने देखील उडी घेतलेली पाहायला मिळाली. अक्षया नाईक ला देखील अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना तिने म्हटले आहे की, ‘ तुम्हाला कसं कळलं काकू? कारण इतकी सुंदरता आणि पॉजीटीव्हीटी एका साडीत मावणं खरच अवघड आहे. काळजी घ्या’ यापुढे अक्षया अन्वीताला साथ देताना म्हणते की, पुढच्या वेळी ४ वापर गं, बिंदास ‘.

अक्षयाची ही प्रतिक्रिया पाहून अन्वीताने तिचे कौतुक केले आहे. तर काही चाहत्यांनी देखील या ट्रोलिंगचा खरपूस समाचार घेतलेला पहायला मिळतो आहे. अक्षया नाईक ही देखील अशाच मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली. बऱ्याचदा ऑडिशनला जाताना तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले होते हे तिने तिच्या वेगवेगळ्या पोस्टमधून उघडकीस आणले होते. त्यामुळे अशा ट्रोलिंगला कशा पद्धतीने सामोरं जायचं असतं हे तिने आता चांगलंच समजून घेतलेलं आहे. त्याचमुळे तिची ही चपराक देणारी प्रतिक्रिया कौतुकास पात्र ठरत आहे. अनेक कलाकारांनी देखील तिला सपोर्ट करत अश्या कमेंट करणाऱ्यांना धारेवर धरलेलं पाहायला मिळत आहे. अन्वीताच्या बॉडी शेमिंगवरून खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्स आता तरी पुन्हा अश्याप्रकारे तिला त्रास देणार नाहीत अशीच अपेक्षा आहे.