स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवले गेले होते त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात व्यत्यय येऊ नये यासाठी मालिकांचे शूटिंग अन्य राज्यात हलवले गेले. बहुतेक मराठी मालिका तसेच हिंदी मालिका ज्या अगोदर महाराष्ट्रात शूट केल्या जात होत्या त्यांनी गोवा, गुजराथ तसेच हैद्राबाद सारख्या ठिकाणी जाऊन शूट करण्याला पसंती दिली आहे. अर्थात हा बदल काही दिवसंकरिता असेल असे वर्तवले जात आहे कारण मालिकेचे सर्वच तंत्रज्ञ अन्य राज्यात हलवणे फारच खर्चिक काम आहे.
महाराष्ट्रावरील सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हे सर्व घडून येत असले तरी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन थांबू नये या यामागचा मुख्य उद्देश आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लवकरच नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या मालिकेचे शूटिंग आता गोव्यात नुकतेच सुरू झाले असून गौरी आणि जयदीपची ही आवडती जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाही येत आहे. गोव्यात नुकतेच मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून या मालिकेच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. गोव्यातील मालिकेचे शूट जेथे केले जात आहे त्या घराचा परिसर निसर्गाने व्यापलेला दिसून येत आहे. घराच्या सभोवतालची गर्द हिरवीगार झाडी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनाही इथे काम करायची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. सेटवरील दिलेल्या ह्या फोटोवरूनच मालिकेचा हा सेट कसा असेल हे तुमच्या लक्षात येईल. येत्या काही दिवसातच मालिकेतील हा बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर असतील हे वेगळे सांगायला नको.