देवयानी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी लवकरच बाबा बनणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेतून संग्रामने मुख्य भूमिका साकारली होती. तुमच्यासाठी काय पण …हा मालिकेतला डायलॉग देखील त्यावेळी खूपच प्रचलित झाला होता. ५ मार्च २०१८ रोजी संग्राम साळवीने अभिनेत्री खुशबू तावडे हिच्यासोबत लग्न केले होते. अभिनेत्री खुशबू तावडे आणि संग्रामने आपल्या इंस्टाग्रामवरून “बेबी शॉवर ” चे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून आपल्या कुटुंबात आणखी एका चिमुकल्या पावलांचे आगमन होणार असल्याचे सांगत ही आनंदाची बातमी दिली आहे.

संग्राम साळवी हा मूळचा कोल्हापूरचा. कामानिमित्त तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाला. देवयानी या मालिकेमुळे संग्रामला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. नुकतीच एक्झिट घेतलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दगडाबाईची चाळ, कुलस्वामिनी, सरस्वती, पन्हाळा अशा चित्रपट आणि मालिकेतूनही त्याला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. तर संग्रामची पत्नी खुशबू तावडे हिने देखील अनेक हिंदी मराठी मालिकांमधून अभिनय साकारला आहे. मेरे साई, देवयानी, तारक मेहता का उलटा चश्मा, प्यार की एक कहाणी, आम्ही दोघी, तू भेटशील नव्याने, पारिजात, तेरे लिये या मालिकेतून खुशबू महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. काही वर्षांपूर्वी संग्राम साळवी आणि खुशबू यांनी मुंबईत ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने स्वतःचे कॅफे सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले होते. खुशबू तावडे हिची सख्खी बहीण तीतीक्षा तावडे ही देखील मराठी मालिका अभिनेत्री आहे. तू अशी जवळी राहा, असे हे कन्यादान, सरस्वती या मालिकेतून ती प्रमुख भूमिका साकारताना दिसली. तिनं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं असून आपली बहीण खुशबूमुळं ती अभिनयाच्या क्षेत्रात आल्याचं सांगते.