टिव्ही वरला कोरोना कधी घरात शिरतो कळत नाही… असे म्हणत चंद्र आहे साक्षीला मालिका अभिनेत्री तसेच नाट्य निर्माती वैशाली राहुल भोसले हिने महा’ मारी काळात घडलेल्या प्रसंगाशी कसे दोन हात केले याचा प्रत्यक्षात आढावा दिला आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला आलेले अनुभव मनाला सुन्न करून जातात…एकीकडे माणुसकीचे उदात्तीकरण आणि दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणारा हा अनुभव सांगताना ती म्हणते… “राहुल कोविड पॉजिटिव होता.. त्यावेळी मी स्टोरी शेयर केली होती.. दरम्यान इथेच सोशल मीडिया वरंच वाचलं होतं.. यातून बरे झाल्यावरही पोस्ट करा. आधार मिळतो.. पॉजिटिविटी मिळते.. म्हणून सविस्तर लिहिणार होते.

पण आज सकाळीच दोन बातम्या कानावर आल्या.. कोविड मध्ये प्लाज्मा थेरेपी बंद होणार.. कारण ती उपयोगी नाही.. त्यावर आणखी एक.. रेमडेसीवीर ही बंद होण्याची शक्यता…इतकं अस्वस्थ वाटतंय.. मोठ्याने किंचाळावंस वाटतंय.. रडावंस वाटतंय..15 दिवसांपूर्वी आम्ही याच प्लाज़्मा आणि रेमडेसीवीर साठी हतबल झालो होतो.. अव्वाच्यासव्वा किमतीला ते विकतही घेतलं.. समोर फक्त एकच लक्ष होतं.. पप्पाना बरं करायचं.. त्यांना वाचवायचं.. फेब्रूवारी पासून पाय फ्रैक्चर असल्याने राहुल दोन अडीच महीने घरीच होता.. एप्रिल मध्ये अचानक ताप आला वायरल म्हणून औषधं घेतली.. फरक पडला नाही.. टेस्ट केली पॉजिटिव आली..दोन मिनिट पायाखालची जमीन सरकली..कसंबसं सावरलं.. आणि ट्रीटमेंट सुरु केली. खरंतर आतून दोघेही प्रचंड घाबरलो होतो. पण कुणी कुणाला दाखवत नव्हतं.. एकमेकांना धीर देत, डॉक्टर शेनॉय ची ट्रीटमेंट घेत, कोविड मधून रिकवर झालेल्या फ्रेंड्स च्या अनुभवाने जे जे करायचं ते करत होतो.. सुदैवाने मला काही सिम्पटम्स नव्हते..हसत रडत 17 दिवस सगळं पाळून एकदाचे आम्ही यातून बाहेर पडलो..राहुल ची एन्टीबॉडीज ची सकाळीच टेस्ट झाली..आणि रात्री गावाहून फोन आला.. माझ्या सासऱ्यांना पप्पाना एडमिट केलंय.. राहुल रिकवर झाल्यावर तिथे गावी पप्पाना ताप येत होता.. इतक्या वर्षात पप्पाना बरं नाही असं कधी झालं नव्हतं.. योगा, मॉर्निंग वॉक, प्राणायाम असं सगळं ते अनेक वर्ष करत होते..एक दोन दिवसांत ताप उतरला नाही. तेव्हा राहुल ने त्यांना कोविड टेस्ट करून घ्यायचा सल्ला दिला.. पण त्यांनी तो साफ नाकारला “नाई नाई मला तसलं काही नाही झालंय.” (याआधी बऱ्याच वेळा पप्पानी सांगितलं होतं.. पॉज़िटिव आले की गावात वाळीत टाकतात.) त्या भीतीने कदाचित ते प्रत्येक वेळी हेच सांगत होते.. “मला आता बरं वाटतंय..” आणि 7 तारखेला.. त्यांना टेस्ट करावी लागली.. सकाळपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला.. आणि रात्री टेस्ट पॉसिटीव आली..वय वर्ष 64 एडमिट केलं.. यावेळी मात्र आम्ही दोघेही अतिप्रचंड घाबरलो.. सोबत कुणी मोठं नव्हतं. सगळे निर्णय आम्हालाच (राहुललाच)घ्यायचे होते..पण नुकताच राहुल यातून बाहेर पडला होता. त्यामुळे तसे होप्स होते.. वयोमानाप्रमाणे पप्पाना थोड़ा जास्त वेळ लागेल बरं व्हायला असाच विचार करत होतो.

दुसऱ्या दिवशी राहुल धावत पळत सुहास ला घेऊन गावी पोहोचला..राहुल ला पाहुन त्यांना धीर आला..आणि मग सुरु झाला प्रवास.. ऑक्सीजन.. सीटिस्कोर.. सीटिस्कैन.. शुगर.. बी. पी… वेंटिलेटर.. दुसरं हॉस्पिटल.. प्लाज्मा.. रेमडेसीवीर चा काळा बाजार..होतील ते सगळे प्रयत्न केले त्यांना वाचवायचे….अपयशी ठरलो..परफेक्ट माणुस.. वयाच्या 8व्या वर्षापासून परिस्थितीशी झगडणारा, वक्तशीर, टापटिप, हिशेबी, सदैव आनंदी, सकारात्मक वृत्ती, वयाच्या 56/57 व्या वर्षी गाडी शिकून एकटे मुंबई – सातारा प्रवास करणारे, स्वावलंबी, कमालीचे निष्ठावान, 9वर्ष त्यांनी आपल्या पैरलाईसड बायकोला.. वाचवलं.. जगवलं. अहोरात्र सेवा केली.. कधीच खचले नाही ते. स्वतःच्या बाबतीत मात्र खचले. 11 तारखेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला..”आमचा बापमाणुस गेला”…आणि मग..पप्पा म्हणत होते तसे अनुभव यायला लागले.. सगळ्यांच्या टेस्ट नेगेटिव येऊन ही.. गावाने खरंच आम्हाला वाळीत टाकले. कार्यालाही कुणी पुजारी यायला तयार होईना.. ज्यावेळी आधाराची गरज असते तेव्हा प्रत्यक्षरित्या खरंच कुणी नव्हतं..या काळात सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहेच.. पण भावनिक अंतर वाढले तर माणुसकी वरचा विश्वास उडतो..जसं जमेल तसं कार्य उरकलं आणि क्वारंटाइन झालो…यासगळयात पहिल्या दिवसापासून अश्विनी, निलेश, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, अमर कुंभार, सुहास, अविनाश, राहुल चे जवळचे फ्रेंड्स, आमची फॅमिली सगळ्यांनीच मोलाची मदत केली..नाना सीरियस असतानाही आशु, नीलेश होईल ती मदत करत होते.. अमर कुंभार.. कोण कुठले.. आशु,नीलेश च्या सांगण्यावर काही मिनिटात राहुलच्या आधी पपांजवळ पोहोचले होते..आणि त्यांची जमेल ती काळजी घेत होते. एकीकडे माणुसकी चं उद्दात दर्शन..तर दुसरीकडे प्लाज्मा रेमडेसीवीरचा काळा बाजार करणारे..माणुसकीला काळीमा फासणारे..हे सगळं इथे असे लिहायचे कारण एवढंच.. पहिल्यास ठेच दूसरा शहाणा.या कठीण काळात एकमेकांना आधार देऊया..योगासने, प्राणायाम, मेडिटेशन ही त्रिसूत्री पाळूया.कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊया.घरी राहुया स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवूया..दुर्लक्ष करू नका.. वेळीच उपाय केला की सुखरूप बाहेर पडता येतं..आठवणींपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची असतात..