पूर्वी चित्रपटांत अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत अभिनेत्रींना फारच कमी रोल करायला मिळत असे पण अश्या काही अभिनेत्री देखील होऊन गेल्या ज्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. इतकंच नाही तर त्यांच्या चित्रपटांना सिनेमा गृहात हाउसफुल्ल चे बोर्ड देखील लागले. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री रंजना. रंजनाच्या आई देखील अभिनेत्री होत्या. ६० ते ७० च्या दशकातील नवरंग, स्री, दो आँखे बारा हाथ, पिंजरा, अमर भूपाळी सारखे चित्रपट गाजवून अभिनेत्री संध्या यांनी आपल्या अभिनयाचा ठसा हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीत उमटवला होता. संध्या यांचे लग्नाआधीचे नाव विजया देशमुख त्यांची बहीण वत्सला देशमुख यादेखील नाटक क्षेत्रात कार्यरत होत्या. दोघी बहिणींना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि नाटक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान मराठी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व्ही शांताराम हे एका चित्रपटासाठी नवख्या अभिनेत्रीच्या शोधात होते. “अमर भूपाळी” चित्रपटासाठी संध्या यांची निवड करण्यात आली. १९५१ सालचा हा चित्रपट एवढा गाजला की मुंबईत तो तब्बल १०४ आठवडे बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. यानंतर संध्या यांनी व्ही शांताराम सोबत हिंदी मराठीतील असे चित्रपट साकारले. याचदरम्यान व्ही शांताराम आणि संध्या यांचे सूर जुळू लागले. व्ही शांताराम यांचे पहिले लग्न विमलाबाई यांच्यासोबत झाले होते. त्यांच्यापासून त्यांना प्रभात कुमार हा मोठा मुलगा( याच नावाने त्यांनी आपली कंपनी स्थापन केली) तर सरोज, मधुरा आणि चारुशीला या तीन मुली झाल्या. चारुशीला यांचा मुलगा सिद्धार्थ रे (जन्मनाव सुशांत रे ) “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात शंतनूची भूमिका साकारताना पाहायला मिळाला. सिद्धार्थने अनेक हिंदी मराठी चित्रपट गाजवलेले देखील पाहायला मिळाले होते. परंतु खूप वर्षांपूर्वीच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. तर मधुरा या मुलीचा विवाह प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पंडित जसराज यांच्यासोबत झाला. मधुरा आणि पंडित जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज ही देखील हिंदी भाषिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते.

व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी “जयश्री” या हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. जयश्री यांच्यापासून किरण शांताराम ( प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते), राजश्री आणि तेजश्री अशी तीन अपत्ये झाली. परंतु कालांतराने व्ही शांताराम आणि जयश्री यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान व्ही शांताराम यांनी अभिनेत्री संध्या यांच्यासोबत तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला त्यांच्या पहिल्या पत्नी विमलाबाई यांची देखील अनुमती मिळाली असल्याचे सांगितले जाते.व्ही शांताराम आणि संध्या याना एकही अपत्य झाले नाही परंतु त्यांची हीच सात मुले त्यांनी आपलीच समजून त्यांचा सांभाळ केला. त्या नात्याने सिद्धार्थ रे हा संध्या यांचा नातू होय तर संध्या यांची बहीण वत्सला देशमुख या अभिनेत्री ‘रंजना’ यांच्या आई आहेत. या नात्याने रंजनाच्या सख्या मावशीचा नातू म्हणजेच रंजना आणि सिद्धार्थ यांच्यातील नाते मावशी आणि भाचा असे आहे. रंजना आणि सिद्धार्थ यांनी एकत्रित “चानी ” हा मराठी चित्रपट साकारला होता यात सिद्धार्थने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही शांताराम यांनीच केले होते.