विदर्भाची मुलगी आता चक्क बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोबत झळकणार आहे. नाशिक येथील प्रीती नारनवरे ही अभिनेत्री एका संधीची वाट पाहत आता नाटक, मालिका साकारत असतानाच हिंदी सृष्टीत आपल्या नावाचा डंका गाजवताना दिसत आहे. लवकरच प्रीती नारनवरे ही अक्षय कुमार सोबत ‘फिलहाल’ या हिंदी अल्बममध्ये झळकणार आहे. ही प्रीती नारनवरे नेमकी आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊयात… प्रीती नारनवरे ही अभिनेत्री असून तीने नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

ती मूळची नागपूरची मात्र वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे कुटुंब चंद्रपूर येथे स्थायिक झाले. इथेच तिचे संपूर्ण शिक्षणही झाले. प्रीतीला सुरुवातीपासूनच मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याची ईच्छा होती मात्र बहीण भाऊ चांगले शिकून डॉक्टर बनले त्यामुळे साहजिकच तिच्या घरच्यांकडून मॉडेलिंगला विरोध होता. कॉस्मेटिकमध्ये शिक्षण घेण्यासाठी तिने नागपूर गाठले पण मॉडेलिंगचे वेध तिला कायम खुणावत राहिले. ‘मला केवळ एक संधी द्या’ असे म्हटल्यावर घरच्यांकडून मॉडेलिंग करण्याची तिने परवानगी घेतली. मॉडेलिंग करत असतानाच बहुजन रंगभूमीशी ती जोडली गेली. यामुळे अभिनयाची गोडी तिच्यात निर्माण झाली. अभिनयात सरस व्हायचे असेल तर मुंबई गाठावी लागणार या हेतूने तिने मुंबईच्या दिशेने आपली पाऊले वळवली. इथं आल्यावर नाटक , चित्रपट, मालिका, असा प्रवास तिचा सुरू झाला. अभिनय क्षेत्रात ती आता चांगलीच रुळू लागली असतानाच बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सोबत काम करण्याची नामी संधी चालून आली. फिलहाल या प्रदर्शनापूर्वीच हिट ठरलेल्या अल्बममध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली आहे.

त्यामुळे विदर्भाची कन्या बॉलिवुड क्षेत्रात नाव लौकिक करत असल्याची चर्चा आहे. आपल्या कारकिर्दीत तिने आजवर बॉलिवूड मधील विकी कौशल , आदित्य रावल, मानुषी छिल्लर आणि आता अक्षय कुमार सोबत काम केले आहे. एकामागून एक मिळत गेलेल्या संधींमुळे प्रीती प्रसिद्धीच्या झोतात येत राहिली. अक्षय कुमार सोबत काम करायला मिळाले त्यावेळी प्रीतीला खूप दडपण आले होते. काही केल्या तो सिन पूर्ण होत नव्हता मात्र अक्षय कुमारने धीर देऊन तिला सिन पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. तारक मेहता का उलट चष्मा या लोकप्रिय मालिकेतून प्रीतीला छोटीशी भूमिका मिळाली होती. आजवर प्रीतीने १४ मालिकांमधून अभिनय साकारला आहे . रंगभूमीपासून तिचा सुरू झालेला हा प्रवास बॉलिवूड पर्यँत मजल मारण्यास सज्ज झाला हे तिच्या मेहनतीचे यश म्हणावे लागेल. प्रीती नारनवरे हिला पुढे आणखी यश मिळत राहो हीच सदिच्छा…