गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचे बार उडत आहेत. कुणाचा साखरपुडा होतो तर कुणी सात फेरे घेत आहेत. राणादा आणि पाठकबाई या ऑनस्क्रिन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नं केल्यानंतर आता संत बाळूमामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सुमित पुसावळे यानेही दोनाचे चार हात केले आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील सुमितने त्याच्या खऱ्या आयुष्यातील सत्यभामा म्हणून जळगावच्या मोनिका महाजनची निवड केली आहे. आज १४ डिसेंबरला सांगोला येथे सुमित आणि मोनिका यांचं दणक्यात लग्न झालं. सुमितच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून सुमित आणि मोनिका यांच्या लग्नाचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत.

सुमित पुसावळे याने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या, मात्र सुमितला खरी लोकप्रियता मिळाली ती बाळूमामा या भूमिकेमुळेच. गेल्या तीन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या मालिकेचा टीआरपीही अव्वल आहे. बाळूमामांच्या तरूणपणापासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंतच्या अनेक छटा दाखवण्यात अभिनेता सुमित पुसावळे याने बाजी मारली आहे. सुमित या मालिकेमुळे चर्चेत असतोच पण १६ नोव्हेंबरला सुमितने एका मुलीच्या हातात हात घातलेला फोटो शेअर केला होता. सुमितच्या इन्स्टापेजवर शेअर झालेल्या या फोटोतून सुमितच्या आयुष्यात एक मुलगी आली असल्याची शंका चाहत्यांना आली. त्यानंतर लगेच सुमितने मोनिकासोबत प्रीवेडिंग फोटो शूट करत असल्याचे फोटो शेअर केले. उनका हात पकडना तो एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था अशी कॅप्शन सुमितने मोनिकासोबतच्या फोटोला दिली होती. तर शी सेड येस असं म्हणत त्याने दुसरा फोटो शेअर केला. त्यानंतर सुमित लग्न करत असल्याची बातमी पसरली. लग्न ठरल्याची बातमी दिल्यानंतर महिन्याभराच्या आतच सुमित आणि मोनिकाच्या लग्नाचा बार १४ डिसेंबरला उडाला.

सुमित आणि मोनिका यांचं अरेंज मॅरेज आहे. मोनिका ही मुळची जळगावची असून ती आयटी सेक्टरमध्ये काम करते. नोकरीच्या निमित्ताने मोनिका औरंगाबादला राहते. तर सुमितचं मूळ गाव सांगली आटपाडी आहे. १३ डिसेंबरला सुमितचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम झाला. यावेळी पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात सुमित राजबिंडा दिसत होता. लग्नासाठी सुमितने मोती रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाची धोती घातली होती. तर मोनिकाने लाल रंगाच्या पैठणीची निवड केली होती. अनेक मालिकांतून झळकलेले सुमित बाळुमामाच्या मालिकेमुळे घराघरात पोहचला. स्वराज्यरक्षक संभाजी आणि लगीर झालं जी मालिकेत त्याने छोटा रोल साकारला असला तरी तोही रोल तितकाच महत्वाचा आणि उत्तम रित्या सादर केलेला पाहायला मिळाला. अभिनेता सुमित आणि मोनिका या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा…